James Anderson retire from Tests - महान गोलंदाज जेम्स अँडरसन याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी दबाव आणल्यामुळे अँडरसनने ही निवृत्ती घेतल्याची चर्चा आहे. मॅक्युलम यांना युवा जलदगती गोलंदाजाला संघात संधी द्यायची आहे आणि त्यासाठी त्यांनी ४१ वर्षीय अँडरसनला निवृत्ती घ्यायला लावली, असे वृत्त पसरले होते. पण, आज कसोटीत ७०० विकेट्स घेणारा एकमेव जलदगती गोलंदाज अँडरसन याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्याच्या शेवटच्या कसोटीची तारीख जाहीर केली.
कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा जेम्स अँडरसन जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडसाठी शेवटचा लाल चेंडूवर खेळणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारताविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत ७०० कसोटी बळींचा टप्पा त्याने गाठला होता. या अनुभवी वेगवान गोलंदाजाने सोशल मीडियावर निर्णय जाहीर केला. अँडरसनने कसोटीत १८७ सामन्यांत ७०० विकेट्स घेतल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २६९, तर ट्वेंटी-२०त १८ विकेट्स आहेत.
अँडरसनने लिहिले की,''सर्वांना नमस्कार. लॉर्ड्सवरील उन्हाळ्यातील पहिली कसोटी ही माझी शेवटची कसोटी असेल हे सांगण्यासाठी मी ही पोस्ट लिहीत आहे. लहानपणापासून मला क्रिकेटची आवड होती आणि तो खेळ खेळताना माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करताना पूर्ण केलेली २० वर्षे अविश्वसनीय होती. मी इंग्लंड संघासोबत दौऱ्यावर जाणे मिस करणार आहे. पण, मला माहीत आहे की स्वतः बाजूला होऊन इतरांना त्यांच्या स्वप्नांसाठी जागा मोकळी करून देण्याची वेळ योग्य आहे, कारण यापेक्षा मोठी भावना नाही.''
''डॅनिएला, लोला, रुबी आणि माझ्या पालकांच्या प्रेमाशिवाय व समर्थनाशिवाय मी हे करू शकलो नसतो. त्यांचे खूप खूप आभार. तसेच, ज्या खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांना हे जगातील सर्वोत्कृष्ट काम केले आहे त्यांचे आभार. मी पुढे असलेल्या नवीन आव्हानांसाठी उत्सुक आहे, तसेच आता गोल्फ खेळून पुढील दिवस काढू शकतो. वर्षानुवर्षे मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार,''असेही त्याने लिहिले.