अहमदाबाद : येथे गुलाबी चेंडुने दिवस-रात्र कसोटी सामना खेळविला जाणार आहेे. या सामन्यात इंग्लंडचे पारडे जड राहील, असे मत इंग्लंडचा फलंदाज जॅक क्राऊली याने व्यक्त केले आहे.
अविश्वसनीय जलदगती गोलंदाजी आक्रमण आणि असाधारण फलंदाजी यामुळे भारतीय संघ मजबूत संघ आहे. मात्र, गुलाबी चेंडूने होणाऱ्या या सामन्यात इंग्लंडचे पारडे जड राहील. कारण इंग्लंडला जलदगती गोलंदाजीच्या परिस्थितीत खेळण्याचा अनुभव आहे. चार सामन्यांची मालिका आता १-१ अशी बरोबरीत आहे.
तिसरा सामना बुधवारपासून सरदार पटेल मोटेरा स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. क्राऊली याने सांगितले की, मला वाटते की, येथे सर्व काही आमच्या अनुरूप राहील. आम्ही अशा परिस्थितीत खेळतच मोठे झालो आहोत. जलदगती गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थितीत चेंडू उशिराने खेळण्याचा प्रयत्न करू शकता. त्यामुळे आम्ही म्हणू शकतो की, भारतीयांच्या तुलनेत आमच्याकडे या परिस्थितीतील अनुभव जास्त आहे.’ त्याने सांगितले की, भारताकडे अविश्वसनीय जलदगती गोलंदाज आणि असाधारण फलंदाज आहेत.
लाल चेंडूच्या तुलनेत गुलाबी चेंडू अधिक स्विंग करतो, तरी क्राऊलीच्या मते फिरकीपटू कसोटीच्या निर्णयात मोठी भूमिका बजावू शकतात. तो म्हणाला की, जर स्विंग होत असेल तर जलदगती गोलंदाजांना मदत मिळते. मला आशा आहे की, गेल्या दोन कसोटी सामन्यांच्या तुलनेत या सामन्यात जलदगती गोलंदाजांना जास्त बळी मिळु शकतात.’ क्राऊलीने सांगितले की, येथे फिरकीला अधिकची उसळी मिळु शकते.’ क्राऊली हा चेपॉकच्या ड्रेसिंग रूममध्ये पाय घसरून पडला. त्यामुळे तो पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळू शकला नव्हता.