England's Will Smeed smashes 97 runs - इंग्लंडचा २० वर्षीय फलंदाज विल स्मीद यानं पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL) पदार्पणातच धमाका केला. क्यूएत्ता ग्लॅडिएटर्स ( Quetta Gladiators) संघाकडून खेळताना त्यानं पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत ९७ धावा कुटल्या. जेसन रॉयच्या जागी ग्लॅडिएटर्स संघानं सोमरसेटच्या या स्टार खेळाडूला करारबद्ध केले. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर संघानं ४ बाद १९० धावांचा डोंगर उभा केला, परंतु पेशावर झाल्मी संघानं हे लक्ष्य पार केले.
स्मीदची ९७ धावांची खेळी ही PSL मधील इंग्लिश खेळाडूची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. याआधी हा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनच्या ( former England skipper Kevin Pietersen) नावावर होता. स्मीद हा अहसान अलीसोबत सलामीला मैदानावर उतरला आणि दोघांनी पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची विक्रमी भागीदारी केली. अलीनं ४६ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावा केल्या.
दुसरीकडे स्मीदला शतक पूर्ण करण्यासाठी अखेरच्या षटकात ८ धावाच करायच्या होत्या. ९७ धावांवर असताना त्यानं खणखणीत फटका मारला, परंतु सीमारेषेवर पॅट्रीक ब्राऊननं तो टिपला. स्मीदनं ६२ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांसह ९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पेशावर संघानं ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला. कर्णधार शोएब मलिकने नाबाद ४८ धावा व हुसैन तलाटने ५२ धावांची खेळी करून संघाला हा विजय मिळवून दिला.