नॉटिंगहॅम : इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांच्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. इंग्लंडने या सामन्यात निर्धारीत 50 षटकांत 6 बाद 481 अशी विश्वविक्रमी धावसंख्या उभारली. यापूर्वी सर्वाधिक धावांचा विक्रम हा श्रीलंकेच्या नावावर होता. श्रीलंकेने नेदरलँड्सविरुद्ध 443 धावा करत विश्वविक्रम रचला होता. हा विक्रम इंग्लंडने यापूर्वी मोडीत काढत पाकिस्तानविरुद्ध 444 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने पुन्हा एकदा नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आणि स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला. इंग्लंडने सुरुवापासूनच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर प्रहार करायला सुरुवात केली. इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोव्ह यांनी 159 धावांची दमदार सलामी दिली. रॉय बाद झाल्यावर बेअरस्टोव्ह आणि अॅलेक्स हेल्स यांची जोडी चांगलीच जमली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी रचत संघाला 34 व्या षटकातच तिनशे धावांचा पल्ला गाठून दिला. बेअरस्टोव्हने यावेळी 92 चेंडूंत 15 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 139 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
बेअरस्टोव्हपेक्षा हेल्स यावेळी अधिक आक्रमकपणे खेळत होता. हेल्सने 92 चेंडूंत 16 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 147 धावांची तुफानी खेळी साकारली. इंग्लंडला यावेळी एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रथम पाचशे धावा करण्याची संधी होती, पण त्यांना 481 धावा करता आल्या.