क्रिकेटच्या मैदानात एका एका धावेला महत्त्व असतं. पण काही वेळा मैदानात नांगर टाकणाऱ्या खेळाडूंचीही चांगलीच चर्चा रंगते. भारतीय क्रिकेट संघातील उदाहरण द्यायचे तर द्रविड आणि पुजारा या मंडळींनी मैदानात तग धरून बॅटिंग करत अविस्मरणीय खेळीसह लक्षवेधल्याचे पाहायला मिळाले आहे. कधी कधी अशी खेळी रटाळ वाटते तर कधी कधी मैदानात तग धरणाऱ्या फलंदाजाला दाद द्यावी वाटते. याच धाटणीत लेकासोबत खेळणारा बाप सध्या चर्चेत आहे.
१३७ चेंडू खेळून शून्यावर नाबाद
क्रिकेटच्या मैदानात लेकासोबत बॅटिंगला आलेल्या या खेळाडून आपल्या संघाच्या डावाची सुरुवात केली होती. १३७ चेंडूंचा सामना करत तो शून्यावर तंबूत परतला. तेही नाबाद. या गोष्टीमुळे हा खेळाडू चांगलाच चर्चेत आला आहे. मॅचचे स्कोअर कार्डही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते. जाणून घेऊयात कोण आहे तो खेळाडू अन् मॅचमध्ये काय घडलं? यासंदर्भातील रंजक स्टोरी
संघाच्या धावफलकावरील आकडा चक्रावून टाकणारा
इंग्लंडमधील डर्बीशर काउंटी क्रिकेट लीगमधील डिव्हिजन-९ स्पर्धेत मिकेलओव्हर क्रिकेट क्लब आणि डार्ले एबे क्रिकेट क्लब यांच्यातील सामन्यादरम्यान कमालीचा सीन पाहायला मिळाला. मिकेलओव्हर क्रिकेट क्लबनं ३५ षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २७१ धावा केल्या होत्या. यात या संघाच्या सलामीच्या बॅटरनं १२८ चेंडूत १८६ धावा ठोकल्या. पण चर्चा रंगली ती डार्ले एबे क्रिकेट क्लबच्या ओपनरची आणि त्यांच्या धावफलकाची. या क्लब संघाने ४५ ओव्हरमध्ये ४ विकेट्स गमावून २१ धावा केल्या. परिणामी सामना अनिर्णित राहिला.
बापलेकानं मिळून टाळला संघाचा पराभव
या सामन्यात डार्ले एबे क्रिकेट क्लबकडून सलामीला आलेल्या इयान बेस्टविक आणि त्याचा मुलगा थॉमस बेस्टविक या दोघांनी मिळून २०८ चेंडूचा सामना केला. यात त्यांनी फक्त ४ धावा काढल्या. इयान बेस्टविकनं तर १३७ चेंडू खेळूनही एकही धाव काढली नाही. बाप-लेकांनी मिळून चिवट खेळी करत संघाचा पराभव टाळला. हा सामना क्लब स्तरावरील असला तरी याची चर्चा जगभरात रंगताना दिसतीये.