क्रिकेटसाठी काय पण! हे आपण अनेकदा ऐकलं आहे आणि भारतात तर असे लाखो चाहते पाहिलेही आहेत. पण, क्रिकेटच्या वेडापाई चाहता चक्क १० महिने परदेशात राहिला... आपला संघ कधीतरी त्या देशाच्या दौऱ्यावर येईल आणि त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळेल, या आशेनं तो घरी परतलाच नाही.. परदेशात राहून त्यानं DJ चं कामही केलं... सोशल मीडियावर सध्या याच सुपर फॅनची चर्चा आहे. शनिवारी तर राष्ट्रीय संघाच्या कर्णधारानंही त्याला मुजरा केला...
श्रीलंकाविरुद्धइंग्लंड यांच्यातील कसोटी सामना गॅल येथे सुरू आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं लंकन गोलंदाजांची धुलाई करताना २२८ धावांची खेळी केली. त्याचे हे कसोटीतील चौथे आणि कर्णधार म्हणून दुसरे द्विशतक आहे. कर्णधार म्हणून दोन द्विशतकं झळकावणारा रूट हा इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला. द्विशतक पूर्ण केल्यानंतर रूटनं प्रथम ड्रेसिंग रुमच्या दिशेनं बॅट व हेल्मेट उंचावून सहकाऱ्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला. त्यानंतर त्यानं स्टेडियम शेजारी असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याच्या दिशेनं बॅट उंचावली... तेथे इंग्लिश संघाचा सुपर फॅन रॉब लुईस ( Rob Lewis) होता आणि रूटनं विषेशकरून त्याच्या क्रिकेटप्रेमाची दाद देण्यासाठी त्याच्या दिशेनं बॅट उंचावली.
मार्च २०२०मध्ये इंग्लंडचा संघ लंकनं दौऱ्यावर आला होता, परंतु कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येमुळे तो दौरा स्थगित करण्यात आला. त्यावेळी रॉबही श्रीलंकेत दाखल झाला. पण, तो मायदेशात परत गेला नाही. आपला संघ पुन्हा येथे येईल आणि त्यांचा खेळ प्रत्यक्ष पाहायला मिळेल, या आशेनं तो गेली १० महिने श्रीलंकेतच तळ ठोकून आहे. बेव डिझायनर असलेला रॉब लंकेतच राहून काम करत होता आणि काही वेळेस त्यानं DJचंही काम पाहिलं. इंग्लंडचा संघ पुन्हा श्रीलंका दौऱ्यावर आलाय हे कळताच त्याच्यासाठी आनंद गगनात मावेनासा झाला. पण, कोरोना व्हायरसमुळे स्टेडियमवर प्रेक्षकांना एन्ट्री नसल्यानं रॉब निराश झाला. मात्र, त्यानं हार मानली नाही.
स्टेडियमनजीक असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यावर जाऊन तो बसला आणि तेथून आपल्या संघासाठी तो चिअर करतोय... सुरुवातीला श्रीलंका पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही, परंतु इंग्लिश मीडियानं त्याचं क्रिकेटवेड प्रसिद्ध केल्यानंतर त्याला परवानगी मिळाली. ऐव्हाना इंग्लंड क्रिकेट संघालाही त्याच्याबद्दल समजले होते आणि त्यामुळेच रुटनं द्विशतकानंतर किल्ल्यावर उभ्या असलेल्या रॉबच्या दिशेनं बॅट उंचावली.