लीड्स, इंग्लंड वि. पाकिस्तान : गचाळ क्षेत्ररक्षण, सुमार गोलंदाजीनं पुन्हा एकदा पाकिस्तान संघाचा घात केला. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या पाकिस्तान संघाला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. एकीकडे पाकिस्तानचे माजी खेळाडू वर्ल्ड कप विजयाचा दावा करताना संघाची प्रत्यक्ष कामगिरी निराश करणारी ठरत आहे. मालिका गमावल्यानंतर पाचव्या आणि अखेरच्या वन डे सामन्यात पाकिस्तानकडून संघर्षाची अपेक्षा होती. मात्र, इंग्लंडने त्यांना डोकं वर काढू दिले नाही. इंग्लंडच्या 9 बाद 351 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 297 धावांतच तंबूत परतला. इंग्लंडने पाच सामन्यांची मालिका 4-0 अशी खिशात घालून पाकचा सुफडा साफ केला.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला जेम्स व्हिंस आणि जॉनी बेअरस्टो यांनी दमदार सुरुवात करून दिली. या दोघांची 63 धावांची भागीदारी शाहीन आफ्रिदीनं संपुष्टात आणली. त्यानं व्हिंसला ( 33) बाद केले. त्यापाठोपाठ इमाद वासीमने बेअरस्टो ( 32) ला बाद केले. जो रूट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी इंग्लंडला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं कूच करून दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 117 धावा जोडल्या. पण, आफ्रिदीनं इंग्लंडच्या कर्णधाराला बाद करून ही जोडी तोडली. मॉर्गन 64 चेंडूंत 4 चौकार व 5 षटकार खेचून 76 धावा करून माघारी परतला. त्यानंतर रूटने 84 आणि जोस बटलर ( 34) व टॉम कुरण ( 29*) यांनी इंग्लंडला 9 बाद 351 धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानचे तीन फलंदाज अवघ्या 6 धावांत माघारी परतले. ख्रिस बोक्सने पाकला धक्के दिले. बाबर आजम आणि सर्फराज अहमद यांनी 146 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्य होत्या. पण, 27व्या षटकात आदील रशीदच्या गोलंदाजीवर सर्फराजने चेंडू हलकाच टोलवला आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला असलेला बाबर रन घेण्यासाठी धावला. पण, सर्फराजने त्याला माघारी जाण्यास सांगितले आणि खेळपट्टीच्या मध्यभागात आल्यानंतर तो माघारी येण्यासाठी परतला. तेव्हा जोस बटलरने चेंडू रशीदच्या दिशेने फेकला आणि रशीदने बाबरला धावबाद केले. या विकेटने सामना पुन्हा इंग्लंडच्या बाजूनं झुकला. बाबरने 80 धावा केल्या. त्यापाठोपाठ सर्फराजही 97 धावांवर धावबाद झाला.