नॉटिंगहॅम, इंग्लंड वि. पाकिस्तान : इंग्लंड दौऱ्यावरील पाकिस्तान संघाच्या लाजीरवाण्या पराभवाची मालिका चौथ्या सामन्यातही कायम राहीली. इंग्लंडने चौथ्या वन डे सामन्यात 341 धावांचे लक्ष्य सहज पार करताना पाच सामन्यांची मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडने 3 विकेट व 3 चेंडू राखून हा सामना जिंकला. या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आल्याचे पाहायला मिळाले. पण, त्याच वेळी संघातीस सर्वात अनुभवी फलंदाज शोएब मलिकनं स्वतःचं हसं करून घेतलं. सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हकच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली आणि त्याला सामन्यातून माघार घ्यावी लागली. मार्क वूडच्या गोलंदाजीवर स्क्वेअर लेगला फटका मारताना इमामच्या कोपऱ्याला ही दुखापत झाली. त्यानंतर तो वेदनेने मैदानावर विव्हळत होता. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याची दुखापत गंभीर नसल्याचे नंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले.
त्यानंतर फाखर झमान ( 57) आणि बाबर आझम ( 115) यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. त्यांना मोहम्मद हाफिज ( 59) आणि शोएब मलिक ( 41) यांची उत्तम साथ लाभली. या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 7 बाद 340 धावा केल्या. बाबर आणि फाखर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 107, तर बाबर आणि हाफिज यांनी तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. बाबर बाद झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी मलिकवर होती. त्याने 26 चेंडूंत 41 धावा चोपून काढल्या आणि त्यात 4 चौकार लगावले. मात्र, त्याची ही खेळी हास्यात्मकरित्या संपुष्टात आली. 47 व्या षटकात मार्क वूडच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात शोएब हिटविकेट झाला. त्याने बॅटने चेंडू टोलवण्याऐवजी चक्क स्टम्प्स उडवले. त्याच्या या बाद होण्यावर जल्लोष करावा की पोट भरून हसावे, हेच वूडला कळेनासे झाले. सोशल मीडियावर मात्र मलिकवर जोक्स फिरू लागले आहेत.
पाहा पूर्ण व्हिडीओhttps://www.facebook.com/englandcricket/videos/904729016559648/