Join us  

ENGvPAK : 7 आठवड्यांची 'नन्ही परी' हॉस्पिटलमध्ये असूनही 'तो' मैदानावर लढला... इंग्लंडचा विजय साकारला!

जेसन रॉयच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या वन डे मालिकेत पाकिस्तानला नमवून 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 2:53 PM

Open in App

नॉटिंगहॅम, इंग्लंड वि. पाकिस्तान : जेसन रॉयच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या वन डे मालिकेत पाकिस्तानला नमवून 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. रॉयने 89 चेंडूंत 114 धावांची खेळी करताना इंग्लंडला 341 धावांचे लक्ष्य पार करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. इंग्लंडने हा सामना 3 विकेट राखून जिंकला. पाकिस्तानने 340 धावा उभ्या केल्या होत्या. पण, या सामन्यात मैदानावर उतरण्यापूर्वी जेसन रॉय नऊ तास हॉस्पिटलमध्ये होता. त्याची सात आठवड्यांची मुलगी आजारी पडली होती आणि रॉय तिच्यासोबत होता. 

सामना संपल्यानंतर रॉयने या गोष्टीचा खुलासा केला. मध्यरात्री 1.30 वाजता मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आणि सकाळी 8.30 वाजेपर्यंत तो हॉस्पिटलमध्येच होता. काही तासांच्या विश्रांतीनंतर तो मैदानावर परतला आणि मॅच संपताच पुन्हा मुलीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला. आता त्याच्या मुलीची प्रकृती सुधारली आहे. तो म्हणाला,''माझ्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी हे शतक विशेष आहे. माझ्या लहान परीला मला मध्यरात्री 1.30 वाजता हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले. सकाळी 8.30 वाजेपर्यंत मी तेथेच होतो आणि नंतर काही तासांची विश्रांती घेतली. वॉर्म अपच्या काही मिनिटांआधीच मी मैदानावर पोहोचलो आणि शतकी खेळी केली. हे शतक खूप भावनिक आहे.'' 

इंग्लंड दौऱ्यावरील पाकिस्तान संघाच्या लाजीरवाण्या पराभवाची मालिका चौथ्या सामन्यातही कायम राहीली. इंग्लंडने चौथ्या वन डे सामन्यात 341 धावांचे लक्ष्य सहज पार करताना पाच सामन्यांची मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. पाकिस्तानकडून फाखर झमान ( 57) आणि बाबर आझम ( 115) यांनी दमदार खेळी केली. त्यांना मोहम्मद हाफिज ( 59) आणि शोएब मलिक ( 41) यांची उत्तम साथ लाभली. या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 7 बाद 340 धावा केल्या. या कामगिरीसह सलग तीन वन डे सामन्यांत 340+ धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानने नावावर केला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच संघ ठरला. इंग्लंडच्या टॉम कुरणने चार विकेट घेतल्या.

जेसन रॉय ( 114), बेन स्टोक्स ( 71*),  जेम्स व्हिंस ( 43), जो रूट ( 36) आणि टॉम कुरण ( 31) यांनी इंग्लंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडने 3 विकेट व 3 चेंडू राखून हा सामना जिंकला. इंग्लंडच्या या विजयाने पाकिस्तानला लाजीरवाण्या विक्रमाचा सामना करावा लागला. 340+ धावा करूनही सलग तीन सामन्यांत पराभव पत्करणारा तो पहिलाच संघ ठरला. हा त्यांचा चौथ्या सर्वात मोठा पराभव ठरला.  

ENGvPAK : पाकिस्तान करायला गेला पराक्रम, चार तासांत नोंदवला लाजीरवाणा विक्रम

ENGvPAK : शोएब मलिकनं करून घेतलं स्वतःचं हसं; गोलंदाजाचं काम झालं सोपं, पाहा कसं!

ENGvPAK : सर्फराज अहमदनं धावबाद केलं, पण अपील करायला विसरला; जाणून घ्या कारण

टॅग्स :इंग्लंडपाकिस्तान