नवी दिल्ली : प्रेक्षकांमुळे कुठल्या चुरशीच्या सामन्यात निश्चित रंगत निर्माण होते, पण कुठल्याही खेळातील मनोरंजन हे त्याच्या दर्जावरून निश्चित होते. याची प्रचिती कोविड-१९ महामारीनंतर पुन्हा सुरू झालेल्या इंग्लिश प्रीमियर लीगच्या लढतींवरून येते, असे मत वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान ओल्ड ट्रॅफर्डवर ८ जुलैपासून जैविक रूपाने सुरक्षित वातावरणात प्रेक्षकांविना खेळल्या जाणार आहे. होल्डिंग म्हणाले,‘प्रेक्षक जल्लोष करण्यासाठी महत्त्वाचे आहेत, पण जसे ब्रिटनमध्ये फुटबॉलला सुरुवात झाली आहे. मनोरंजन हे मैदानावर खेळल्या जात असलेल्या फुटबॉलच्या दर्जावरून होते.’ कोविड-१९ महामारीमुळे क्रिकेटवर होणाऱ्या आर्थिक परिणामांबाबत बोलताना होल्डिंग म्हणाले,‘यामुळे कुठल्याही क्रिकेट प्रकाराला झळ बसेल असे मला वाटत नाही. क्रिकेट बोर्डांची जास्तीत जास्त कमाई टीव्ही करारातून होते. क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर सर्वकाही सुरळीत होईल.’