लंडन : शानदार नेतृत्व कौशल्याच्या बळावर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडला यशोशिखर गाठून देणारा कर्णधार इयोन मॉर्गन याने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. २०१५ च्या विश्वचषकातील अपयशानंतर संघाची सूत्रे सांभाळणाऱ्या मॉर्गनने पांढऱ्या चेंडूच्या प्रकारात सडेतोड आणि आक्रमकवृत्तीद्वारे संघाला नवी उंची गाठून दिली.
त्याच्याच नेतृत्वात २०१९ ला इंग्लंडने वन डे विश्वचषक जिंकला. त्याने प्रत्येक दिग्गज संघांविरुद्ध मालिका विजय साजरा केला. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडच्या यशाची सरासरी ६० टक्के इतके आहे. मॉर्गन हा २०१० च्या टी-२० विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघातही होता. त्याच्या नेतृत्वात इंग्लंड २०१६ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मॉर्गनच्या नावावर सर्वाधिक २२५ वन डे आणि ११५ टी-२० सामन्यांसह सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करण्याचा आणि दोन्ही प्रकारांत सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम आहे.