भारतीय संघाने साधली बरोबरी; विंडीज १०७ धावांनी पराभूत

रोहित, राहुल, रिषभ, श्रेयस यांचा झंझावात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 05:13 AM2019-12-19T05:13:27+5:302019-12-19T05:13:47+5:30

whatsapp join usJoin us
Equal achievement by Indian team; windies lost by 107 runs | भारतीय संघाने साधली बरोबरी; विंडीज १०७ धावांनी पराभूत

भारतीय संघाने साधली बरोबरी; विंडीज १०७ धावांनी पराभूत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विशाखापट्टणम : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत दुसरा सामना जिंकायचाच, अशा निर्धाराने मैदानात उतरलेल्या भारतीयांनी प्रथम वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची बेदम पिटाई केली. यानंतर गोलंदाजांनी विशेषत: कुलदीप यादवने हॅट्ट्रिक घेत वेस्ट इंडिजच्या आक्रमक फलंदाजांना रोखले. या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा दुसºया सामन्यात १०७ धावांनी पराभव करीत मालिकेत १-१ अशी महत्त्वपूर्ण बरोबरी साधली.


एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर सलग दुसºया सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेकीचा कौल गमावला. विंडीज कर्णधार किएरॉन पोलार्डने अपेक्षेप्रमाणे क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला खरा; मात्र ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे पोलार्डचा निर्णय चुकीचा ठरला. दोघांनी दिलेली विक्रमी द्विशतकी सलामी आणि यानंतर रिषभ पंत-श्रेयस अय्यर यांनी सादर केलेला झंझावात या जोरावर भारताने ५० षटकांत ५ बाद ३८७ धावांचा एव्हरेस्ट उभारला. यानंतर विंडीजचा डाव ४३.३ षटकांत २८० धावांमध्ये संपुष्टात आला.


या भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना विंडीजचे फलंदाज सुरुवातीपासून दडपणाखाली आले आणि आक्रमकतेच्या प्रयत्नात त्यांनी तंबूची वाट धरली. सलामीवीर शाय होप आणि निकोलस पूरन यांनी संघासाठी अपयशी प्रयत्न केले. होपने ८५ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या. पूरनने ४७ चेंडंूत ६ चौकार व ६ षटकारांसह ७५ धावा फटकावल्या. मोहम्मद शमीने ३०व्या षटकात पूरन व पोलार्ड यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद केले. कुलदीपने ३३व्या षटकातील अखेरच्या तीन चेंडूंवर अनुक्रमे होप, जेसन होल्डर (११) व अल्झारी जोसेफ (०) यांना बाद करून हॅट्ट्रिक घेत सामना भारताच्या बाजूने झुकविला. पहिल्या सामन्यात चमकलेला शिमरॉन हेटमायर (४) या वेळी अपयशी ठरला. कीमो पॉल विंडीजचा बाद होणारा अखेरचा फलंदाज ठरला. त्याने ४२ चेंडंूत ४६ धावा केल्या. कुलदीप व शमी यांनी प्रत्येकी ३ बळी, तर रवींद्र जडेजाने २ बळी घेतले.


दरम्यान, भारताने या सामन्यात विजय मिळवला असला, तरी गोलंदाजांना कामगिरी उंचावण्यात फारसे यश आले नाही. त्यामुळे रविवारी कटक येथे होणाºया अंतिम व तिसºया सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी भारतीय गोलंदाजांना अधिक सक्षमपणे मारा करावा लागेल. त्यात शमी आणि कुलदीप यांनी कमी धावा घेत महत्त्वपूर्ण बळी घेतल्याने भारताला दिलासा मिळाला.


तत्पूर्वी, रोहित आणि राहुल यांच्या विक्रमी द्विशतकी सलामीच्या जोरावर भारताने धावांचा एव्हरेस्ट उभारला. रोहित-राहुल यांनी भारताच्या भक्कम धावसंख्येचा पाया रचला; मात्र यावर कळस चढवला तो रिषभ पंत-अय्यर यांनी. या चौघांच्या तुफान फटकेबाजीपुढे विंडीजच्या गोलंदाजांना मजबूत चोप बसला. भारताची ही वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी सर्वोत्तम धावसंख्या असून एकदिवसीय क्रिकेटमधील एकूण आठवी सर्वोत्तम धावसंख्या आहे. याआधी डिसेंबर २०११ मध्ये भारताने विंडीजविरुद्ध ५ बाद ४१८ धावा उभारल्या होत्या.
रोहितने १३८ चेंडंूत १७ चौकार व ५ षटकारांसह १५९ धावांची तुफानी खेळी केली. त्याला जबरदस्त साथ दिलेल्या राहुलने १०४ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह १०२ धावा केल्या. दोघांनी भारताला शानदार सुरुवात करून देताना २२७ धावांची सलामी दिली. भारतीय फलंदाजांनी या सामन्यात आक्रमक पवित्रा घेताना अखेरच्या ७ षटकांत १०० धावा फटकावल्या. ३७व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अल्झारी जोसेफने राहुलला बाद करून विंडीजला पहिले यश मिळवून दिले. यानंतर पोलार्डने कोहलीला पहिल्याच चेंडूवर बाद करत भारताला मोठा धक्का दिला.


या वेळी भारतीयांवर काही प्रमाणात दडपण आले खरे; मात्र एका बाजूने टिकलेल्या रोहितने हे सर्व दडपण झुगारून लावताना विंडीजवर तुफानी आक्रमण केले. दीडशतक पूर्ण केल्यानंतर सर्वांना वेध लागले ते रोहितच्या विश्वविक्रमी चौथ्या द्विशतकाचे. मात्र शेल्डॉन कॉटेÑलने रोहितला बाद करून विंडीजसाठी बहुमूल्य बळी मिळवला. रोहित-राहुल यांची फटकेबाजी थांबल्यानंतर सुरू झाला तो पंत-अय्यर यांचा झंझावात.
दोघांनी २४ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी करीत विंडीज गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. श्रेयसने ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५३ धावा, तर रिषभने १६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ३९ धावांचा तडाखा दिला. दोघांनी भारताला साडेतीनशेचा पल्ला पार करून दिलाच; शिवाय संघाची वाटचाल चारशे धावांच्या दिशेने ठेवली. मात्र मोक्याच्या वेळी दोघेही बाद झाल्याने भारताला चारशे धावांपर्यंत पोहोचण्यात यश आले नाही. केदार जाधवनेही १० चेंडूंत ३ चौकारांसह नाबाद १६ धावा कुटल्या.

संक्षिप्त धावफलक : भारत : ५० षटकांत ५ बाद ३८७ धावा (रोहित शर्मा १५९, लोकेश राहुल १०२, श्रेयस अय्यर ५३, रिषभ पंत ३९, केदार जाधव नाबाद १६; शेल्डॉन कॉटेÑल २/८३, किएरॉन पोलार्ड १/२०, कीमो पॉल १/५७, अल्झारी जोसेफ १/६८.) वि. वि. वेस्ट इंडिज : ४३.३ षटकांत सर्वबाद २८० धावा (शाय होप ७८, निकोलस पूरन ७५, कीमो पॉल ४६, एविन लुईस ३०, खेरी पिएरे २१; मोहम्मद शमी ३/३९, कुलदीप यादव ३/५२, रवींद्र जडेजा २/७४.)

कोहलीचा ७ वर्षांनी ‘गोल्डन डक’
विशाखापट्टणममध्ये कायमच कोहलीची बॅट तळपली आहे. याआधी त्याने या ठिकाणी ११८, ११७, ९९, ६५ आणि नाबाद १५७ धावांची खेळी केली आहे. मात्र बुधवारी त्याला विंडीज कर्णधार पोलार्डच्या पहिल्याच चेंडूवर माघारी परतावे लागले. यापूर्वी २०१३ साली इंग्लंडविरुद्ध कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच, तर एकूण तिसऱ्यांदा कोहली पहिल्या चेंडूवर परतला. विशेष म्हणजे पोलार्डही या सामन्यात ‘गोल्डन डक’चा मानकरी ठरला. दोन्ही संघांचे कर्णधार एकाच सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद होण्याचा अनोखा योगायोग या सामन्यात घडला.

Web Title: Equal achievement by Indian team; windies lost by 107 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.