पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) निलंबित केलेल्या पीच क्यूरेटर पांडुरंग साळगावकर यांना संघटनेच्या सर्व पदांवरून निलंबित केले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन केला असल्याचे एमसीएचे अध्यक्ष अॅड. अभय आपटे यांनी सांगितले. या निलंबनावर बीसीसीआयनेही शिक्कामोर्तब केला आहे.
‘बीसीसीआय’चे कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी म्हणाले, ‘पांडुरंग साळगावकर यांना तातडीने क्युरेटर पदावरून निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर एमसीएनेही (महाराष्ट्र क्रिकेट संघटना) त्यांना सर्व पदावरून निलंबित केले आहे.’
क्रिकेट सामन्याआधी अधिकाºयांव्यतिरिक्त मैदानात कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही, असे असताना पत्रकाराला प्रवेश कसा मिळाला, याआधीही असे प्रकार घडले होते. पत्रकाराने साळगावकरांना विचारले की, ‘दोन खेळाडूंना जास्त उसळी असणारी खेळपट्टी हवी आहे, ते शक्य आहे का?’ यावर साळगावकरांनी ते शक्य असल्याचे सांगितले. या खेळपट्टीवर ३३७ ते ३४० इतक्या धावा होतील. तसेच या धावांचा यशस्वी पाठलागही करता येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. बीसीसीआय व आयसीसीच्या नियमांना धाब्यावर बसवीत साळगावकर यांनी या पत्रकाराला खेळपट्टीची पाहणीही करू दिली. विशेष म्हणजे पुण्याच्या गहुंजे येथील मैदानातील खेळपट्टीच्या दर्जाविषयी आयसीसीने याआधीही ताशेरे ओढले होते. फेब्रुवारीमध्ये भारत-आॅस्ट्रेलिया दरम्यान कसोटी सामना येथे झाला होता. भारताची दोन्ही डावांमध्ये १०५ व १०७ अशी धुळधाण उडाली होती. तीन दिवसांत संपलेल्या या सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारताला ३३३ धावांनी धूळ चारली होती.
>कोण आहेत पांडुरंग साळगावकर?
भारताजे माजी क्रिकेटपटू पांडुरंग साळगावकर यांचा जन्म १५ आॅक्टोबर १९४९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे झाला. वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. १९७१ ते १९८२ दरम्यान ते महाराष्ट्राकडून रणजी सामने खेळले.
१९७१-७२ च्या रणजी मोसमात महाराष्ट्र संघाकडून पदार्पण करताना त्यांनी चार सामन्यांत २३.३३ च्या सरासरीने १५ विकेट घेतल्या.
१९७२-७३ च्या मोसमात इराणी ट्रॉफीमध्ये मुंबई विरुद्ध शेष भारताकडून खेळताना त्यांनी सहा बळी घेतले. त्यात भारतीय कर्णधार अजित वाडेकर यांना त्यांनी दोनदा बाद केले. त्यानंतर मुंबई विरुद्धच्या रणजी सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना त्यांनी सुनील गावसकर यांची विकेट घेतली होती.
>पिच फिक्सिंगच्या आरोपांत अडकलेल्या पांडुरंग साळगावकर यांना एमसीएने निलंबित केले आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत साळगावकर यांचे निलंबन कायम राहील. चौकशीसाठी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. असले प्रकार कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून, दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. - अभय आपटे, एमसीएचे अध्यक्ष
Web Title: The establishment of the inquiry commission will not tolerate the pitch-fixing type - Abhay Apte
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.