जालना - आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या बंगळरु संघातील महाराष्ट्राचा खेळाडू नववर्षाच्या मुहूर्तावर विवाहबंधनात अडकला आहे. विजय झोलनं जालना येथे राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना खोतकर हिच्याशी लग्नगाठ बांधली. 2011च्या भारतीय अंडर 19 संघाचा तो कर्णधारही होता. सध्या विजय झोल महाराष्ट्रच्या संघातून खेळतोय. तर आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरुच्या संघात आहे.
आपल्या धडाकेबाज खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या विजयचा विवाह जालना येथे पार पडला. मोजके आप्तेष्ट आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत विधिवत हा लग्न सोहळा झाला. गेल्या अनेक दिवसांपासून विजय आणि दर्शनाच्या लग्नाची चर्चा होती. अखेर नव्या वर्षाचा मुहूर्त साधत हे जोडपं विवाहबद्ध झालं.
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवास्थानीच काही मुख्य पाहुणे आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. विवाह सोहळ्यातील बडेजावपणा व खर्चाला फाटा देत खोतकर कुटुंबीयांनी नवा पायंडा पाडला. राज्यमंत्री खोतकर यांचा १ जानेवारी हा वाढदिवस असतो. या पार्श्वभूमीवर मुलीचा विवाह सोहळा त्यांनी शहरातील त्यांच्या निवासस्थानीच आयोजित केला होता. साधेपणाने सोहळा आयोजित केल्याने नातेवाईकांसह मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती होती.
विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री गुलाब पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, खा. संजय जाधव, आ. राजेश टोपे, आ. हेमंत पाटील, आ. शशिकांत खेडेकर, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी. आ. अरविंद चव्हाण, माजी आ. विलास खरात, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, उद्योजक व अधिकाºयांची उपस्थिती होती.