पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना अपयश आलं. सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. काल या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. भारतीय टॉप ऑर्डरचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. सामन्यात पावसाचे आगमन झाल्याने निकाल लागला नाही. पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रौफ या त्रिकुटाने १४.१ षटकांत भारताचे चार फलंदाज बाद केले होते. त्यानंतर इशान किशन आणि हार्दिक पांड्याच्या जोडीनं भारताची लाज राखली अन् मोठी भागीदारी नोंदवली.
रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी या सामन्यात अत्यंत खराब कामगिरी केली, परंतु भारताचे माजी सलामीवीर सुनील गावस्कर यांनी या स्टार फलंदाजांचा उघडपणे बचाव केला. तसेच हा एक खेळाचा भाग असल्याचे गावस्करांनी सांगितलं.
काळजी करण्याचं काहीच कारण नाही - गावस्करपाकिस्तानविरूद्धच्या सामन्याबद्दल बोलताना गावस्कर म्हणाले की, मला वाटत नाही की यात काळजी करण्यासारखे काही मोठे आहे. तुम्ही या खेळाडूंचे रेकॉर्ड बघा. विराटने ११००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत तर रोहितने ९००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तसेच शुबमन गिल काय करू शकतो आणि किती सक्षम आहे ते त्यानं दाखवून दिलं आहे. कोहली आणि रोहितसारखे मोठे खेळाडू जरी अपयशी ठरले, तरीही आपल्याकडे ५ आणि ६ व्या क्रमांकावर जबरदस्त फलंदाज आहेत, जे २६० च्या पुढे धावसंख्या नेऊ शकतात. त्यामुळे आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत राहतात आणि समोर चांगले गोलंदाज असल्यावर हे होत राहते. गावस्कर 'स्पोर्ट्स तक'शी बोलत होते.
भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाची बॅटिंग आशिया चषकातील तिसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुरूवातीपासूनच सावध खेळणाऱ्या भारतीय फलंदाजांना पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीने सतावले. शाहीन आफ्रिदीने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना बाहेरचा रस्ता दाखवून आपला इरादा स्पष्ट केला. त्यापाठोपाठ हारिस रौफने सलामीवीर शुबमन गिलला बाद केले. पण, इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या भागीदारीने भारताचा डाव सावरला. अखेर भारताला संपूर्ण ५० षटके देखील खेळता आली नाहीत अन् टीम इंडिया ४८.५ षटकांत २६६ धावांवर सर्वबाद झाली.
भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक (८७) धावा केल्या, तर इशान किशनने (८२) खेळी करून पाकिस्तानसमोर सन्मानजनक आव्हान उभे करण्यात मोलाचा हातभार लावला. किशन-पांड्याने पाचव्या बळीसाठी मोठी भागीदारी नोंदवून सामन्यात रंगत आणली. या दोघांना वगळता एकाही भारतीय फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. सामन्यात वेगवान गोलंदाजांचा दबदबा राहिला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर हारिस रौफ आणि नसीम शाह यांना प्रत्येकी ३-३ बळी घेण्यात यश आले.