मुंबई - भारतीय क्रिेकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आज एक सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो. विराट कोहली आज ज्या ठिकाणी आहे तिथे पोहोचण्यासाठी त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूपर्यंतचा विराटचा प्रवास अगदीच सोपा नव्हता. पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी विराट कोहलीच्या आयुष्यातील अशाच एका घटनेचा त्यांचं पुस्तक 'डेमोक्रसीज इलेव्हन - द ग्रेट इंडियन क्रिकेट स्टोरी'मध्ये लिहिलं आहे. या पुस्तकात त्या घटनेचा उल्लेख आहे, ज्याने विराटला एक गंभीर खेळाडू म्हणून समोर आणलं.
विराट कोहली आपले वडिल प्रेम कोहली यांच्या फार जवळ होता. प्रेम कोहली एक फौजदारी वकील होते. विराट कोहली नऊ वर्षांचा असताना त्याला आपल्या स्कूटरवर बसवून ते पश्चिम दिल्ली क्रिकेट अकॅडमीत घेऊन गेले होते. 2006 साली प्रेम कोहली यांचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला होता. ते 54 वर्षांचे होते. त्यावेळी विराट फक्त 18 वर्षांचा होता, आणि दिल्लीच्या रणजी टीमकडून खेळत होता. पहिल्या दिवशी कर्नाटकने पहिल्या सत्रात 446 धावा केल्या होत्या. दुस-या दिवशी खेळताना दिल्ली संघ मात्र अडचणीत सापडला होता. दिल्लीने आपल्या पाच विकेट्स गमावल्या होत्या. विराट कोहली आणि संघासमोर यावेळी सामना वाचवण्याचं आवाहन होतं.
दिवसाचा खेळ संपेपर्यंत विराट कोहली आणि यष्टीरक्षक पुनीत बिष्ट यांच्या मदतीने दिल्लीची धावसंख्या 103 पर्यंत पोहोचली होती. कोहली 40 धावांवर नाबाद राहिला होता. मात्र त्याच रात्री विराट कोहलीच्या आयुष्यातील एक दु:खद घटना घडली होती, ज्याने विराटच्या आयुष्याला कलाटणी दिली. 19 डिसेंबर 2016 च्या रात्री प्रेम कोहली यांचं निधन झालं होतं. ही बातमी ड्रेसिंग रुमपर्यंत पोहोचली होती. इतका मोठा धक्का बसला असताना आणि वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जायचं असल्याने विराट कोहली आता पुढे खेळणार नाही असंच सर्वांना वाटलं होतं. संघ प्रशिक्षकानेही दुस-या खेळाडूला विराटच्या जागी मैदानात उतरण्यासाठी तयारी करायला सांगितलं होतं.
मात्र दुस-या दिवशी सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा विराट कोहली मैदानात उतरला. आपल्या आयुष्यातील एवढा मोठा धक्का पचवत विराट कोहली फक्त खेळला नाही, तर 90 धावा करत दिल्लीला फॉलोऑनपासून वाचवलं. जेव्हा विराट कोहली आऊट झाला तेव्हा दिल्लीला सामना वाचवण्यासाठी फक्त 36 धावांची गरज होती. यानंतर विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये पोहोचला आणि आपण कसे आऊट झालो आहोत हे पाहिलं, आणि त्यानंतर वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी निघून गेला. त्या एका घटनेने विराटला एक गंभीर आणि सर्वोत्तम खेळाडू म्हणून तयार केलं.