मुंबई : बऱ्याच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणार नसल्याचे एका क्रिकेटपटूने जाहीर केले होते. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून त्याने निवृत्ती घेतलेली होती. पण आता देशासाठी पुन्हा एकदा ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळण्यासाठी हा क्रिकेटपटू सज्ज झाला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये काही महिन्यांनंतर ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. विश्वचषकासाठी संघाची बांधणी अजून सुरु आहे आणि संघाला काही अनुभवी खेळाडूंची गरजही आहे. त्यामुळे या क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली असली तरी त्याने आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचे ठरवले आहे.
या क्रिकेटपटूने २०१६ साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर २०१९ साली ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती जाहीर केली होती. पण आता ट्वेन्टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून तो पुन्हा एकदा देशाकडून खेळताना दिसणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असली तरी वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो हा आयपीएलमध्ये खेळत होता. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना ब्राव्होने भरीव कामगिरी केली होती, त्याचबरोबर आपण फिट असल्याचेही त्याने दाखवले होते. त्यामुळे आता वेस्ट इंडिजच्या संघाकडून पुन्हा एकदा ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळण्यासाठी ब्राव्हो सज्ज झाला आहे. आता ट्वेन्टी-२० विश्वचषकात ब्राव्हो काय कमाल दाखवतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.