दिल्ली कॅपिटल्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये बुधवारी तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीसमोर काल कोलकाता नाईट रायडर्सने ७ बाद २७२ धावांचा डोंगर उभा केला. आयपीएल इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. या लक्ष्याचा पाठलाग करताना DC चा संघ १६६ धावांवर ऑल आऊट झाला. पण, दिल्लीकडून रिषभ पंत ( ५५) व त्रिस्तान स्तब्स ( ५३) यांनी अर्धशतक झळकावून संघर्ष केला. त्यांची आघाडीची फळी गडगडली. पण, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) हा पंतच्या फलंदाजीवर फार काही आनंदी दिसला नाही. त्याने त्याची विकेट फेकली असे तो म्हणाला. रिषभने मैदानावर उभं राहुन त्याच्या अर्धशतकाचे रुपांतर मोठ्या खेळीत करायला हवं होतं, असे मत सेहवागने व्यक्त केले.
डिसेंबर २०२२ मध्ये जीवघेण्या कार अपघातातून बरा झाल्यानंतर जवळपास १५ महिन्यानंतर रिषभने IPL मध्ये पुनरागमन केले. विशाखापट्टणम येथे KKR विरुद्ध खेळताना त्याने सलग दुसरे अर्धशतक झळकावले.
“त्याची फलंदाजी चांगली होती, तो फॉर्ममध्ये परतला आहे आणि शानदार स्ट्राइक रेटने धावा करत आहे. आज पहिल्या षटकापासूनच आम्हाला माहित होते की ते जिंकणार नाहीत. फलंदाजीचा सराव करण्याची हीच वेळ होती. आता नेटवर जाण्याऐवजी, तुम्ही येथे २० अतिरिक्त चेंडू खेळून पुढच्या सामन्यासाठीचा सराव इथेच केला असता. पुढच्या सामन्यात लगेच उतरला असता,” असे सेहवाग पुढे म्हणाला.
कॅपिटल्सला पुढील सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचे आहे. नवीन कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आहे.