दुबई : ‘तुम्ही भलेही डॉन ब्रॅडमन असाल; पण तरीही अनेक महिने जैवसुरक्षा वातावरणात (बायो-बबल) राहिल्याने तुमच्या कामगिरीवर आणि मानसिकतेवर त्याचा परिणाम पडणारंच,’ असे भारतीय क्रिकेट संघाचे मावळते मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले. सोमवारी नामिबियाविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपुष्टात आला. यावेळी त्यांनी, ‘खेळाडूंना आयपीएलनंतर विश्वचषक स्पर्धेसाठी काही दिवस विश्रांती मिळणे गरजेचे होते,’ असेही सांगितले.
नामिबियाविरुद्धच्या सामन्यानंतर शास्त्री यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘मी एक गोष्ट सांगू इच्छितो, हे कोणतेही कारण नसून एक सत्य आहे. सहा महिने जेव्हा तुम्ही बायो-बबलमध्ये राहता, तेव्हा त्याचा परिणाम होतोच. भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे तिन्ही प्रकारांच्या संघांतून खेळतात. गेल्या २४ महिन्यांत हे सर्व खेळाडू केवळ २५ दिवसांसाठी आपल्या घरी होते. तुम्ही कोण आहात हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही, तुमचे नाव ब्रॅडमन आहे आणि तुम्हीही बायो बबलमध्ये राहत आहात, तर तुमची सरासरीही घसरणार. कारण तुम्ही मनुष्य आहात.’
चार महिन्यांच्या दीर्घ इंग्लंड दौऱ्यावरून भारतीय संघ थेट यूएईमध्ये आयपीएल खेळण्यास पोहोचला होता. यावर कर्णधार विराट कोहलीनेही दीर्घकाळ बायो बबलमध्ये राहणे शक्य नसल्याचे सांगितले होते. यावर शास्त्री म्हणाले की, ‘पेट्रोल टाकले आणि मोठ्या प्रवासाला निघाले, इतकं हे सोप्पं नाही. यामुळेच माझ्या मते ही अत्यंत कठीण वेळ होती. संघाने या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला आहे. खेळाडूंनी संयम आणि जोश दाखवला. त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही; पण आता संयम तुटेल, त्यासाठी तुम्हाला सावध राहावे लागेल.’ बायो-बबलमुळे थकवा आल्याचेही शास्त्री यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘मी मानसिकरीत्या थकलोय; पण मी सांगू शकतो की, हा वयाचा परिणाम आहे. पण हे खेळाडू शारीरिक आणि मानसिकरीत्या थकले आहेत.
द्रविड संघाला नव्या शिखरावर नेईल!
शास्त्री यांच्या मते, नवे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना शानदार संघ लाभला आहे. ते म्हणाले की, ‘प्रशिक्षक म्हणून माझ्या कारकिर्दीत एका गोष्टीची कमतरता राहिली ती आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद. संघाला आणखी संधी मिळतील आणि राहुल द्रविड आता प्रशिक्षक पदाची जबाबदारी घेणार आहेत. ते संघाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जातील. मी त्यांना शुभेच्छा देतो.’
रोहित अत्यंत सक्षम!
टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहलीने कर्णधारपदावरून दूर होणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. त्याच्या जागी रोहित शर्माकडे नेतृत्त्वाची जबाबदारी येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले. याबाबत शास्त्री म्हणाले की, ‘माझ्या मते, रोहित अत्यंत सक्षम आहे. त्याने आयपीएलमध्ये ५ जेतेपद जिंकली आहेत. तो भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. कर्णधारपद सांभाळण्यास तो सज्ज आहे. विविध प्रकाराच्या संघासाठी वेगवेगळे कर्णधार असणे चुकीची बाब नाही.’
अहमदाबाद फ्रेंचाइजीकडून ऑफर
आयपीएलमधील नवीन संघ असलेल्या अहमदाबाद फ्रेंचाइजीचे मालक सीव्हीसी कॅपिटल्सने शास्त्रींसह त्यांचे सहयोगी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्याशी संपर्क साधला आहे. अद्याप या वृत्ताची अधिकृत घोषणा झालेली नाही. सीव्हीसीने जेव्हा शास्त्री आणि सहयोगी स्टाफशी संपर्क केला होता, तेव्हा हे सर्वजण भारतीय संघासोबत टी-२० विश्वचषकात व्यस्त होते. त्यामुळे शास्त्री आता आयपीएलमध्ये प्रशिक्षकपद सांभाळण्याबाबत लवकरच मोठी घोषणा करू शकतात.