नवी दिल्ली/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश मिळाले होते. मात्र या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. तसेच देशभरातून या घटनेबाबत शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने देखील भंडाऱ्यातील आगीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांचा मृत्यू झाल्याची घटना खूपच धक्कादायक आणि दु:खद आहे, असं ट्विट शोएब अख्तरने केलं आहे.
शोएब अख्तरच्या या ट्विटनंतर पाकिस्तानच्या काही नागरिकांनीही ट्विटरद्वारे शोक व्यक्त केल्या आहे. शोएबच्या ट्विटवर अनेकांनी संवेदना जागवणारे तसंच भावनिक मेसेज केले आहेत.
या दुर्घटनेने उभा महाराष्ट्र तसेच देशही हादरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी दु:ख व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देतानाच मृत शिशूंच्या पालकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली. राज्यातील सरकारी इस्पितळांचे फायर ऑडिट करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
दरम्यान, मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ठेवलं जातं. लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं तिथं कामावर असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. तिनं दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागात धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर तातडीनं रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने अतिदक्षता विभागातील बाळांना बाहेर काढण्यात आलं.
आसमंत भेदणारा बाळंतिणींचा हंबरडा-
आग लागताच बाहेर थांबलेल्या माता व त्यांच्या कुटुंबीयांनी नवजात कक्षाकडे धाव घेतली. ओल्या बाळंतिणी व त्यांचे नातेवाईक डॉक्टर व नर्सेसमागे धावत होते. प्रशासनाने सगळ्या मातांना पोर्चमध्ये बसवून ठेवले. नेमके कुणाचे बाळ दगावले व कुणाचे वाचले, हे बराच वेळ स्पष्ट होत नव्हते. इनबॉर्न विभागातील मुले वाचल्याचे स्पष्ट झाले व दिलासा मिळाला पण आऊटबॉर्न विभागात आग व धूर अधिक होता. तिथली मुले संकटात असल्याचे समजताच झालेला मातांचा आक्रोश सुरू झाला.
Web Title: 'The events in Bhandara are shocking and tragic'; Pakistani citizens, including Shoikh Akhtar, were also shaken
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.