क्रिकेटमध्ये कधी काय होईल, हे कोणीच सांगू शकत नाही. प्रतिस्पर्धी फलंदाजाला रोखण्यासाठी आतापर्यंत अनेक शक्कल लढवण्यात आलेल्या पाहायला मिळाल्या. मग, त्यात शाब्दिक शेरेबाजी, धक्काबुक्की, मुद्दाम अडथळा निर्माण करणे हे प्रकार आलेच. शिवाय क्षेत्ररणाद्वारेही फलंदाजावर दडपण निर्माण केले जाते. पण, आज तुम्हाला अशी एक अतरंगी फिल्डिंग दाखवणार आहोत, की ती पाहून तुम्ही चक्रावून जाल.
कौंटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील सोमरसेट आणि एसेक्स यांच्यातील हा सामना...टॉम अॅबेल ( 45) आणि रोलॉफ व्हॅन डेर मर्वे ( 60) यांच्या खेळाच्या जोरावर सोमरसेटने पहिल्या डावात 203 धावा केल्या. एसेक्सच्या सिमॉन हार्मरने 105 धावा देत 5 विकेट्स घेतल्या, तर सॅम्युएल कूकने 26 धावांत 4 फलंदाज माघारी पाठवले. प्रत्युत्तरात एसेक्सच्या फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीनंतर मधल्या फळीनं शरणागती पत्करली. अॅलेस्टर कूकने 148 चेंडूंत 7 चौकारासह 53 धावा केल्या. त्याला टॉम वेस्टलीने 36 धावा करून चांगली साथ दिली. पण, अन्य फलंदाज अपयशी ठरले. सोमरसेटच्या गोलंदाजांनी 32 चेंडूंत 6 फलंदाजांना माघारी पाठवत एसेक्सचा पहिला डाव 141 धावांत गुंडाळला.
फिरकीपटू जॅक लिच ( 5/32) आणि व्हॅन डेर मर्वे ( 4/41) यांनी आपल्या फिरकीच्या जोरावर एसेक्सचा डाव गुंडाळला. या दोघांनी त्यांच्या गोलंदाजीवर ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावले होते, त्याचे हे यश म्हणावे लागेल. त्यांनी फलंदाजाभवती यष्टिरक्षकासह सात खेळाडूंना उभे केले होते.
पाहा व्हिडीओ...
एसेक्सला दुसऱ्या डावात 1 बाद 45 धावा केल्या. हा सामना अनिर्णित राहिल्यानं एसेक्सला कौंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन वन चे जेतेपद निश्चित झाले. एसेक्सने 14 सामन्यांत 9 विजयांसह 228 गुणांची कमाई करताना गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. एसेक्सला केवळ 1 पराभव पत्करावा लागला, तर चार सामने अनिर्णित राहिले. सोमरसेट 217 गुणांनी दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनीही 9 विजय मिळवले आहेत, परंतु त्यांना तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला.