Join us  

जिंकल्यावर प्रत्येक कर्णधार चांगला वाटतो: अजिंक्य रहाणे; माझ्या नेतृत्वाचे कोणतेही गुपित नाही

मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) सोमवारी आपल्या चॅम्पियन संघाचा गौरव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 10:24 AM

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : 'माझ्या नेतृत्वात कोणतीही विशेष बाब नसून, यामध्ये कोणतेही गुपित नाही. कर्णधार म्हणून मला संघातील सर्व खेळाडू एकसारखे असतात. खेळाडूंना स्वातंत्र्य देणे मला आवडते आणि मी त्यांच्यावर कायम पूर्ण विश्वास ठेवतो. प्रत्येक खेळाडू त्याच्या क्षमतेनुसार मॅचविनर आहे. त्यामुळे मी कर्णधार म्हणून काही वेगळे करतो असे नाही. जिंकल्यावर नेहमीच कर्णधार चांगला वाटतो, पण खरं श्रेय हे संघाचे असते,' असे रणजी आणि इराणी चषक विजेत्या मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने सांगितले. 

मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) सोमवारी आपल्या चॅम्पियन संघाचा गौरव केला. या कार्यक्रमादरम्यान रहाणेने आणि मुंबईच्या काही प्रमुख खेळाडूंनी संवाद साधला. यादरम्यान एमसीएने मुंबई संघाला एक कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले.

रहाणे म्हणाला की, मी पहिल्या दिवशी फलंदाजी करताना २५० चेंडू खेळण्याचे लक्ष्य निर्धारित केले होते आणि त्यानुसार खेळलो. प्रत्येक सत्रानुसार आम्ही योजना आखली. कौंटी क्रिकेट खेळण्याचा मला खूप फायदा झाला. तिथे खेळतानाही मी इराणी चषक लढतीच्या विचारानेच खेळलो. शार्दुल ठाकूर गोल्डन आर्म खेळाडू आहे. पहिल्या डावात त्याची अनुपस्थिती खूप भासली, पण त्याचवेळी इतर चार गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. एकूणच हा सांघिक विजय आहे.

शालेय स्पर्धापासून माझा मोठ्या खेळी खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे मला आता यामध्ये विशेष काही वाटत नाही. या लढतात लहान भाऊ मुशीरसोबत खेळायचे होते, पण त्याआधीच दुर्दैवाने त्याचा अपघात झाला. त्यामुळे मी माझ्या कुटुंबीयांना आणि प्रशिक्षकांना सांगितले होते की जर मी ५०हून अधिक धावा केल्या, तर नक्की द्विशतक झळकावेन. यात १०० धावा माझ्या आणि १०० धावा मुशीरच्या असतील. - सर्फराझ खान

यंदाच्या मोसमात मी रणजी, आयपीएल आणि इराणी विजेत्या संघांचा सदस्य राहिलो आणि एक खेळाडू म्हणून या तिन्ही स्पर्धा जिंकणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. एक टीम म्हणून प्रत्येक खेळाडूचे मुंबई संघाच्या जेतेपदामध्ये योगदान राहिले आहे. - श्रेयस अय्यर

 

टॅग्स :अजिंक्य रहाणे