मुंबई : महान क्रिकेटपटू आणि भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर याने मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या रणजी पदार्पणातील शतकी खेळीवर भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सचिन म्हणाला, ‘मुलामुळे आपल्याला ओळख लाभावी असे प्रत्येक पित्याला वाटते.’ अर्जुनने मंगळवारी राजस्थानविरुद्ध गोवा संघासाठी खेळताना पदार्पणात शतक साजरे केले. तो सातव्या स्थानावर खेळायला आला आणि शतकाची नोंद केली.
एका कार्यक्रमात बोलताना सचिनने आपल्या वडिलांचे स्मरण केले. तो म्हणाला, ‘अशावेळी मला माझ्या वडिलांची आठवण येते.
त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या होत्या. मी देशासाठी खेळणे सुरू केले त्यावेळी त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने दुसऱ्याला सांगितले की, हे सचिनचे वडील आहेत. माझ्या वडिलांनी त्या व्यक्तीचे बोलणे ऐकले होते. वडिलांनी मला सांगितले, ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण आहे.’ त्यामुळेच जेव्हा आपली मुले कामगिरी करतात तेव्हा आनंद गगनात मावेनासा होतो.’
मुलांवर असते दडपण
अर्जुनबाबत सचिन पुढे म्हणाला, ‘एखाद्या क्रिकेटपटूचा मुलगा असल्याचे किती दडपण असते याची मला जाणीव आहे. मी माध्यमांना नेहमी सांगतो की, अर्जुनला क्रिकेटवर प्रेम करू द्या. त्याच्यावर सचिनचा मुलगा असल्याचे दडपण राहू नये. मीदेखील त्याला मोकळेपणाने क्रिकेट खेळताना पाहू इच्छितो. त्याने कधीही अवांतर दडपण घेऊ नये, असा माझा त्याच्यासाठी विशेष प्रयत्न असतो.’
Web Title: Every father's wish is to gain recognition from his son! Sachin's reaction after Arjun's performance
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.