छोरों से कम हैं के...? संघर्षानं इथपर्यंत पोहोचली 19 वर्षांखालील संघातील प्रत्येक मुलगी

19 वर्षांखालील संघातील प्रत्येक मुलगी ही संघर्षाने इथपर्यंत पोहोचली आहे. यापैकी अनेक जणी कधी देशाबाहेरही गेल्या नव्हत्या. 

By स्वदेश घाणेकर | Published: February 5, 2023 12:24 PM2023-02-05T12:24:20+5:302023-02-05T12:33:36+5:30

whatsapp join usJoin us
Every girl in the under-19 team has struggled to reach this point | छोरों से कम हैं के...? संघर्षानं इथपर्यंत पोहोचली 19 वर्षांखालील संघातील प्रत्येक मुलगी

छोरों से कम हैं के...? संघर्षानं इथपर्यंत पोहोचली 19 वर्षांखालील संघातील प्रत्येक मुलगी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

स्वदेश घाणेकर -

भारतीय चाहते २९ जानेवारी २०२३ तारखेला द्विधा मनस्थितीत होते. १९ वर्षांखालील मुलींच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल अन् भारत-न्यूझीलंड यांच्यातली दुसरी ट्वेंटी-२० लढत, जवळपास एकाच वेळी लाईव्ह सुरू होत्या. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी पाहण्याऱ्या प्रेक्षकांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष (टीव्ही, मोबाईल) उपस्थिती कोट्यवधींत होती. पण, ९९ धावांचा पाठलाग करताना या वाघांची शेळी होताना दिसली अन् चाहत्यांनी मुलींच्या ट्वेंटी-२०कडे मान वळवली. शेअर मार्केट वर जावा तसा टीव्ही व मोबाइल वरील या लाइव्ह सामन्याच्या स्ट्रीमिंग पाहणाऱ्यांचा आकडा झपाझप वर गेला. पुरुष क्रिकेट सुरू असताना प्रथमच महिलांच्या क्रिकेटला एवढा मान मिळाला असावा. त्यात सोने पे सुहागा! भारताच्या मुलींनी कमाल करताना हा इंग्लंडकडून ‘लगान’ वसूल केला अन् इतिहास घडविला.

२००७मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली असाच इतिहास घडला होता. आयसीसीची पहिलीवहिली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा भारताने जिंकली होती. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील मुलींनी तोच करिष्मा केला. आयसीसीची स्पर्धा जिंकणारा भारताचा हा महिलांचा पहिलाच संघ ठरला. उपांत्य फेरीत इंग्लंडने अवघ्या तीन धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारतीयांचे टेंशन हलकं केलं होतं. पण, इग्लंड कधी काय करेल, याचा प्रत्यय आल्यामुळे मुली सावध होत्या. 

अर्चना देवी -


अष्टपैलू अर्चना देवी हिचा जन्म उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्याच्या रताई पूर्वा गावातील. गावात लोडशेडिंग अन् घरात अठरा विश्व दारिद्र्य...

आई सावित्री देवीला मॅच पाहता यावी यासाठी अर्चनाने स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेत रवाना होण्यापूर्वी तिला स्मार्ट फोन घेऊन दिला. अर्चनाच्या वडिलांचे कर्करोगामुळे निधन झालेले. एका भावाचा सर्पदंशाने मृत्यू झालेला. त्याच भावाची इच्छा होती म्हणून अर्चना क्रिकेटपटू बनली. घरच्यांपासून दूर वसतिगृहात अर्चना राहत असल्यानं गावकऱ्यांनी घरच्यांना दुषणं दिली, परंतु ‘सावित्री’ची ही लेक अंतिम ध्येयापासून भरकटली नाही. फायनलमध्ये तिने दोन विकेट्स घेतल्याच, शिवाय एक अविस्मरणीय झेल टिपला. 

पार्श्वी चोप्रा -


लेग स्पिनर पार्श्वी चोप्राने स्केटिंग सोडून क्रिकेटला आपलेसे केले आणि वर्ल्ड कपच्या ६ सामन्यांत ११ बळी घेतले. काच कारखान्यात काम करणाऱ्या सोनम यादवची कहाणी काही वेगळी नाही. सोनमच्या वडिलांचा पाठिंबा असतानाही समाजाने ‘वृत्ती’प्रमाणे पाय खेचण्याचा प्रयत्न केला, पण सोनम व तिचे वडील ठाम होते. ओपनर त्रिशा रेड्डीचे क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलांनी आपली चार एकर जमीन विकली. भारताच्या ऐतिहासिक विजयात शिल्पकार ठरलेल्या १५ जणींची कहाणी अशीच आहे. त्यांचं कुटूंब खंबीर उभं राहिल्यामुळे आज भारताला हा सुवर्ण दिवस पाहायला मिळाला.

धोनीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पुरुष क्रिकेटमध्ये झालेली क्रांती अन् खेळण्याचा अप्रोच बदलला. तसाच अप्रोच येणाऱ्या काळात महिला क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल यात आश्चर्य वाटायला नको. भारतातील महिला क्रिकेटच्या या नव्या युगाची नांदी आहे आणि सातत्यपूर्ण कामगिरी करून ती जपण्याची जबाबदारी या मुलींवर आहे.

शेफाली वर्मा -


भारतीय संघाची कर्णधार शेफाली वर्मा हिला विसरून कसे चालेल? वर्ल्ड कप हाती घेण्यापूर्वी शेफाली ढसाढसा रडली. २०२० मध्ये वरिष्ठ महिलांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. शेफाली त्या संघाची सदस्य होती आणि तीन वर्षांनंतर शेफालीने १९ वर्षांखालील मुलींचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. मिताली राज, झुलन गोस्वामी या दोन स्टार्सच्या निवृत्तीनंतर हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रीग्ज, रेणुका सिंग, दीप्ती शर्मा ही एक फळी तयार झाली होती. त्यात आता शेफालीच्या नेतृत्वाखालील युवा पिढी सज्ज झाली आहे. आगामी महिला प्रीमिअर लीगमध्ये अनेकींवर कोट्यवधींची बोली लागू शकते...

Web Title: Every girl in the under-19 team has struggled to reach this point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.