IPL 2024 Auction - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी काल झालेल्या लिलावात पर्समध्ये २३ कोटी रुपये असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अल्झारी जोसेफ ( ११.५० कोटी), यश दयाल ( ५ कोटी), ल्युकी फर्ग्युसन ( २ कोटी), टॉम कुरन ( १.५० कोटी), सौरव चौहान ( २० लाख), स्वप्निल सिंग ( २० लाख) यांना ताफ्यात दाखल करून घेतले. गोलंदाजी ही RCB ची नेहमीची समस्या ठऱली आहे आणि यावेळी लिलावात ते चांगल्या गोलंदाजावर पैसे खर्च करतील असे वाटले होते, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे RCBचा माजी रणनीतीज्ञ प्रसन्ना आगोराम ( Prasanna Agoram ) याने टीका केली आहे.
भारताचा फिरकीपटू आर अश्विन याच्यासोबत बोलताना प्रसन्ना यांनी ही टीका केली. ते म्हणाले RCBच्या गोलंदाजांमध्ये ४ षटकांत ५० धावा कोण देतं, यासाठी स्पर्धा पाहायला मिळेल. ''तरुणपणी प्रत्येकाला ऐश्वर्या रायसोबत आपलं लग्न व्हावं असं वाटत असतं. पण, प्रत्येकाच्या नशीबी ते असतंच असं नाही, बरोबर ना? त्यानंतर जिच्यासोबत संसार थाटतो तिला तूच माझी ऐश्वर्या असं म्हणू लागतो. त्यामुळे मी पण आता असेच म्हणेन. जे खेळाडू पदरी आलेत, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि खेळा,''अशी टीका त्यांनी केली.
आता फॅफ ड्यू प्लेसिस व त्याच्या संघाने आता प्रतिस्पर्धींना टक्कर देण्यासाठी प्रत्येक सामन्यात २६०+ धावा करायला हव्या. त्यामुळे कोणत्याही स्टेडियमवर ते खेळतील तेव्हा प्रथम फलंदाजी करून त्यांना २६० -२८० धावा कराव्या लागतील, असा सल्ला प्रसन्ना यांनी दिला.