Rohit Sharma On Hardik Pandya : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यांची घोषणा केली आहे. यावेळी चाहत्यांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी दिली. प्रसारमाध्यमांनी यावेळी रोहित शर्मालामुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाबाबतही विचारणा केली. या प्रश्नावर रोहित शर्माने योग्य उत्तर दिले आहे. रोहितच्या या उत्तराची सध्या सोशल मीडियावर देखील चर्चा सुरुय.
रोहित शर्माने त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत गेल्या काही महिन्यांपासून अनेक चढ उतार पाहिले. अशातच मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाची जबाबदारी रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याकडे गेले. त्यानंतर आता हार्दिक पांड्याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी उपकर्णधार बनवण्यात आलंय. या सगळ्याबाबत आता रोहित शर्माने बीसीसीआयच्या पत्रकारपरिषदेत भाष्य केलं आहे.
रोहित शर्माने आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्याकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद गमावल्याबद्दल बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रोहित शर्माला मुंबईच्या कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. खासकरुन मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी हा एक कटू निर्णय होता. अनेकांनी हार्दिकला गळ घातली जेव्हा त्याने या आयपीएल हंगामात सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केल्याचे म्हटलं जात होतं. मात्र आता पत्रकार परिषदेतून रोहित शर्मानं या सगळ्या प्रकाराबाबत भाष्य केलं आहे.
"हा सगळा जीवनाचा भाग आहे. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत नाही. तो एक अद्भुत अनुभव होता," असे रोहित शर्मा म्हणाला. यावेळी आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्याच्या बाबतीत तुझा अनुभव कसा होता याविषयी रोहित शर्माला विचारण्यात आलं. यावर रोहितने म्हटलं की, याआधी मी कर्णधार नव्हतो आणि अनेक कर्णधारांच्या नेतृत्वात खेळलो आहे. हे माझ्यासाठी वेगळं किंवा नवीन नाही. दरम्यान रोहित शर्मा महेंद्रसिंह धोनी, वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली यांच्या व्यतिरिक्त ॲडम गिलख्रिस्ट, हरभजन सिंग आणि रिकी पाँटिंग यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळला आहे.
दरम्यान, ३७ वर्षीय रोहित शर्मासाठी आयपीएलचे गेले तीन हंगामात धावा न करता आल्यामुळे टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र यंदाच्या आयपीएलच्या हंगामात रोहित शर्मा फॉर्मात पाहायला मिळत आहे. रोहित शर्माने आयपीएल २०२४ मध्ये १० सामन्यात ३१४ धावा केल्या आहेत.जे काही आहे त्यानुसार तुम्ही खेळता आणि मग एक खेळाडू म्हणून तुमच्याकडून जे अपेक्षित आहे ते करण्याचा प्रयत्न करा. मी गेल्या महिनाभरापासून हे करण्याचा प्रयत्न केला आहे, असं रोहित शर्मानं म्हटलं आहे.