जोस बटलर, बेन स्टोक्स व जोफ्रा आर्चर हे इंग्लंडचे तीन प्रमुख खेळाडू इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात खेळणार नसल्यानं राजस्थान रॉयल्सचे ( Rajasthan Royals) सर्वाधिक नुकसान झाले आहे. पण, RRनं राजस्थान रॉयल्सनेही मंगळवारी जोस बटलर व बेन स्टोक्स यांच्याजागी बदली खेळाडूंची नावं जाहीर केली. वेस्ट इंडिजचा सलामीवीर एव्हीन लुईस आणि जलदगती गोलंदाज ओशाने थॉमस यांना करारबद्ध केले आहे. IPL 2021त फटकेबाजी करण्यापूर्वी एव्हीन लुईसनं कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( Carabian Premier League) वादळी शतक झळकावताना बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्या त्रिनबागो नाइट रायडर्सचा पालापाचोळा केला.
सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स ( St Kitts and Nevis Patriots) संघाचे प्रतिनिधित्व करताना लुईसनं ५१ चेंडूंत वादळी शतक झळकावले. २९ धावांवर असताना लुईसला जीवदान मिळाले आणि त्यानंतर त्यानं नाइट रायडर्सच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. त्यानं ११ षटकार आणि ५ चौकार खेचून १६ चेंडूंत ८६ धावा कुटल्या. जानेवारी २०१९नंतर त्याचे हे ट्वेंटी-२०तील पाचवे शतक ठरले. त्यानं ५२ चेंडूंत नाबाद १०२ धावा करताना संघाला ८ विकेट्स व ३२ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करताना रायडर्सला ७ बाद १५९ धावा करता आल्या. कॉलिन मुन्रो ( ४७) व सुनील नरीन (३३*) यांनी संघाच्या धावसंख्येत हातभार लावला. पॅट्रीओट्सच्या डॉमिनिक ड्रेक्स व जॉन रस जॅगेस्कार यांनी पत्येकी तीन विकेट्स घेतल्या. पॅट्रीओट्सच्या ख्रिस गेलनं १८ चेंडूंत ३५ धावा चोपून लुईलसा चांगली साथ दिली.