Join us  

Team Indiaचा 'हा' क्रिकेटर ठरेल T20 World Cup 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज; भारताच्या माजी खेळाडूचा दावा

बुमराहच्या जागी कोण ठरेल प्रभावी गोलंदाज, याबद्दलही व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 4:16 PM

Open in App

Team India: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे. २३ ऑक्टोबरला भारताचा T20 World Cup 2022 मधील प्रवास सुरू होणार आहे. त्या आधी भारतीय संघाला दोन सराव सामनेही खेळायचे आहेत. इतकेच नव्हे, तर भारतीय संघाने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या स्थानिक संघाविरूद्धही दोन सामने खेळले आहेत. त्यातील एका सामन्यात भारताला विजय मिळवता आला, पण दुसऱ्या सामन्यात भारत पराभूत झाला. केवळ लोकेश राहुलने (KL Rahul) ५५ चेंडूत ७४ धावा केल्या, पण रिषभ पंत, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव यांसारखे दिग्गज खेळाडू अपयशी ठरले. तर रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली सारखे खेळाडू सामनाच खेळले नाहीत. अशा या विचित्र प्रकारच्या कामगिरी नंतरही भारतीय समालोचक आकाश चोप्रा यांने खात्रीपूर्वक एक दावा केला आहे. यंदाच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज हा भारतीय असेल, असा त्याचा दावा आहे. त्याने त्या खेळाडूचे नावदेखील सांगितले आहे. तसेच, तो सर्वोत्तम का ठरू शकतो याचे कारणही स्पष्ट केले आहे. तसेच, बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी कोणता गोलंदाज त्याची भूमिका बजवण्यास सक्षम आहे याबद्दलही त्याने मत मांडले.

आकाशा चोप्राच्या मते भारतीय संघाचा ३० वर्षीय फलंदाज सध्या दमदार फॉर्मात आहे. त्याच्याकडे सर्वोत्तम फलंदाजी करून दाखवण्याची संधी आणि क्षमता दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे त्याने सर्वाधिक धावांचा टप्पा गाठला तर आश्चर्य वाटायला नको असे त्याचे म्हणणे आहे. "लोकेश राहुल हा यंदाच्या टी२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकतो. राहुल सलामीवीर आहे त्यामुळे त्याच्याकडे संपूर्ण २० षटके खेळून काढण्याची संधी आहे. त्यासोबतच, पूर्ण डाव खेळून त्यात अपेक्षेप्रमाणे धावा करण्याची त्याची क्षमता त्याने वेळोवेळी दाखवून दिली आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या या राहुलच्या खेळाला पोषक ठरतील. कारण या खेळपट्ट्यांवर चेंडू बॅटवर वेगाने येतो आणि बाऊन्सही चांगला असतो. अशा खेळपट्टीवर राहुल नक्कीच कमाल करू शकतो," असे आकाश चोप्राने आपल्या यूट्युब चॅनेलवर बोलताना स्पष्ट केले.

बुमराहच्या अनुपस्थितीत 'हा' गोलंदाज करेल नव्या चेंडूने गोलंदाजी

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. अशा वेळी नव्या चेंडूने गोलंदाजी करण्याची जबाबदारी युवा गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) पार पाडू शकतो, असे आकाश चोप्राचे मत आहे. तो नव्या चेंडूनेही गोलंदाजी करेल आणि शेवटच्या टप्प्यातही (Death Overs) गोलंदाजी करेल, असे आकाश चोप्रा म्हणाला. त्याशिवाय, बुमराहप्रमाणेच त्याला मधल्या षटकांच्या टप्प्यातही एखादे षटक टाकायला दिले जाऊ शकते, कारण ऑस्ट्रेलियातील उसळत्या खेळपट्ट्या आणि मोठी मैदाने त्याच्यासारख्या गोलंदाजासाठी पोषक ठरू शकतील, असे आकाश चोप्राने स्पष्ट केले.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2लोकेश राहुलरोहित शर्माअर्शदीप सिंग
Open in App