मुंबई : तामिळनाडू प्रीमिअर ट्वेंटी-20 लीग वादाच्या कचाट्यात अडकत चालली आहे. या लीगमधील एका संघाचे मालकी हक्क असलेले आणि भारताचे माजी सलामीवीर व्ही बी चंद्रशेखर यांच्या आत्महत्येनंतर सुरू झालेल्या तपासात आता धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार सट्टेबाजांनी या लीगमधील एका संघाला आपल्या नियंत्रणात ठेवल्याची गोष्ट उघड झाली आहे. या लीगच्या अंतिम सामन्यापूर्वीच चंद्रशेखर यांनी राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागे फिक्सिंग हे कारण तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.
पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात चंद्रशेखर यांच्या आत्महत्येमागे फिक्सिंगचे कारण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की,''चंद्रशेखर यांची पत्नी, मित्र आणि काही क्रिकेटपटूंशी चर्चा केल्यानंतर या लीगमध्ये बेटिंग रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आले. फिक्सिंगचा या प्रकरणाशी थेट संबंध नसला तरी तपासात मिळालेल्या काही माहितीच्या आधारे तशे संकेत मिळत आहेत. अधिक माहितीसाठी आम्ही मुंबई व दिल्ली पोलिसांशी संपर्कात आहोत.''
क्रिकेट वर्तुळात चंद्रशेखर हे व्ही.बी. या नावाने ओळखले जायचे. तामिळनाडूचे फलंदाज असलेले चंद्रशेखर यांनी भारताकडून सात एकदिवसीय सामने खेळले होते. न्यूझीलंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे त्यांनी भारताकडून पदार्पण केले होते. चंद्रशेखर तामिळनाडूच्या रणजी संघातील जनदार व्यक्तीमत्व होते. चंद्रशेखर यांनी माजी क्रिकेटपटू के. श्रीकांत यांच्याबरोबर बऱ्याच भागीदाऱ्या रचल्या होत्या. चंद्रशेखर हे भारताच्या निवड समितीचे सदस्य होते. त्याचबरोबर त्यांनी तामिळनाडूच्या संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले होते. चेन्नईमध्ये त्यांची एक क्रिकेट अकादमीही सुरु आहे.
भारतीय खेळाडूंना मॅच फिक्सिंगसाठी व्हॉट्सअॅप मॅसेज; बीसीसीआयकडून चौकशीभारतीय क्रिकेटच्या मानगुटीवर बसलेले मॅच फिक्सिंगचे भूत काही केल्या उतरण्याचे नाव घेत नाही. मॅच फिक्सिंग प्रकरणात अनेक क्रिकेटपटूंवर कठोर कारवाई झाल्याचा इतिहास समोर असतानाही वारंवार असे प्रयत्न केले जात आहेत. मॅच फिक्सिंगचे प्रकार रोखण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना केली आहे. तरीही फिक्सर्सकडून नवनवीन मार्गांनी मॅच फिक्स करण्याचे प्रयत्न सुरूच आहे. भारतीय खेळाडूंना काही अज्ञात इसमांनी व्हॉट्सअॅप मॅसेजद्वारे मॅच फिक्सिंगसाठी विचारणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीसीसीआयकडून या प्रकरणाचा तपासही सुरू झाला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या तामीळनाडू प्रीमिअर लीगमधील हा प्रकार आहे. फ्रँचायझीतील काही खेळाडूंना मॅच फिक्सिंगसाठी अज्ञात इसमांनी व्हॉट्सअॅपद्वारे विचारणा केल्याची माहिती बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिली आहे. त्यांनी या प्रकरणाचा तपासही सुरू केला आहे. बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख अजित सिंग यांनी सांगितले की,''अज्ञात इसमांकडून व्हॉट्सअॅप मॅसेज येत असल्याची तक्रार काही खेळाडूंनी आमच्याकडे केली आहे. ते क्रमांक कोणाचा आहे याचा आम्ही शोध घेत आहोत. या संबंधीत आम्ही खेळाडूंचाही जबाब नोंदवला आहे.''