कराची : गेली सहा वर्ष फिक्सिंगचे आरोप फेटाळणाऱ्या पाकिस्तानच्या माजी गोलंदाज दानिश कानेरियाला उपरती सुचली. त्याने इंग्लंडमधील एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत फिक्सिंग केल्याची कबुली दिली आहे. या विवादामुळे एसेक्स क्लबमधील त्याचा सहकारी मर्व्हेन वेस्टफिल्डला कारागृहात जावे लागले होते.
कानेरियावर इंग्लिश क्रिकेटने आजीवन बंदी घातली आहे आणि ती जगभरात लागू होते. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार अल जजीरा चॅनेलच्या डॉक्युमेंटरीत कानेरियाने सांगितले की,''माझे नाव दानिश कानेरिया आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने माझ्यावर 2012 मध्ये फिक्सिंगचे दोन आरोप केले होते. ते आरोप मी मान्य करतो.''
या कृत्याचा पश्चाताप होत असल्याचे सांगून आपल्यावर घातलेली आजीवन बंदी उठवण्यात यावी, अशी विनंती त्याने केली आहे. तो म्हणाला,'' मर्व्हेन, एसेक्स संघातील सहकारी, एसेक्स क्रिकेट क्लब, एसेक्सचे चाहते आणि पाकिस्तानातील चाहत्यांची मी माफी मागतो.''