भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत याच्या अपघातासारखाअपघात आज घडला. श्रीलंकेचा माजी स्टार क्रिकेटर लाहिरू थिरिमाने ( Lahiru Thirimanne ) याला गुरुवारी श्रीलंकेच्या अनुरादापुरा येथील थ्रीपेन परिसरात झालेल्या भीषण रस्ता अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थिरिमानेला किरकोळ दुखापत झाली असून त्याला अनुराधापुरा टीचिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सकाळी ७.४५ च्या सुमारास थिरिमानेची कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका लॉरीला धडकल्याने हा अपघात झाला. अडा डेराना यांनी दिलेल्या वृत्तानुसार, लॉरीच्या समोरासमोर धडक झाल्यानंतर कारने पेट घेतली. या अपघातात ट्रक चालकासह कारमधील अन्य तीन जण जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय उपचार मिळाले आहेत.
२१ वर्षीय थिरिमाने याने २०१० मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केले आणि पुढील काही वर्ष तो श्रीलंकेच्या संघाचा नियमित सदस्य होता. पण, प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला प्रत्येकवेळी संधी मिळाली नाही. तिलकरत्ने दिलशानच्या निवृत्तीनंतर थिरिमानेला संधी मिळाली. त्याने अँजेलो मॅथ्यूजच्या अनुपस्थितीत संघाचे काही सामन्यांत नेतृत्वही संभाळले. २०२२ मध्ये त्याने निवृत्ती जाहीर केली. त्याने ४४ कसोटींत ३ शतकं व १० अर्धशतकांसह २०८८ धावा, १२७ वन डे सामन्यांत ३१९४ धावा केल्या. त्यात ४ शतकं व २१ अर्धशतकांचा समावेश होता.