kane williamson ipl 2023 । नवी दिल्ली : न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसन आयपीएलच्या 16व्या हंगामासाठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सच्या संघाचा भाग आहे. गतविजेत्या संघाच्या ताफ्यात न्यूझीलंडचा दिग्गज सामील झाला आहे. तसेच वर्ल्ड क्लास हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे विल्यमसनने म्हटले आहे. आयपीएल 2023 ची सुरूवात होण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी राहिला आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामातील सलामीचा सामना हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.
दरम्यान, मागील 8 वर्षांपासून सनरायझर्स हैदराबादच्या संघाचा भाग असलेला विल्यमसन प्रथमच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणार आहे. 2023च्या हंगामापूर्वी हैदराबादच्या फ्रँचायझीने रिलीज केल्यानंतर गुजरातच्या फ्रँचायझीने केनला आयपीएलच्या मिनी लिलावात 2 कोटी रूपयांमध्ये खरेदी केले.
त्याने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याबद्दल त्याने म्हटले, "मी अनेक वर्षांपासून हार्दिकच्याविरुद्ध खेळलो आहे. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. मी मागील वर्षी त्याच्याविरुद्ध खेळलो, एक कर्णधार आणि खेळाडू म्हणून त्याच्यासाठी मागील हंगाम अप्रतिम होता. हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी खूप उत्साही आहे." तसेच आयपीएलमधील नवीन इम्पॅक्ट रूल सर्व संघासाठी फायदेशीर असल्याचे देखील केनने सांगितले.
गिल आमच्या संघासाठी महत्त्वाचा खेळाडू - विल्यमसन भारताचा सलामीवीर शुबमन गिलचे कौतुक करताना विल्यमसनने म्हटले, "एक युवा, अत्यंत प्रतिभावान खेळाडू म्हणून आवश्यक असलेले अनुभव घेणे आणि ते खरोखरच आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणे हे महत्त्वाचे असते. तशी प्रतिभा आमच्या संघाचा सलामीवीर शुबमन गिल याच्यात आहे, म्हणूनच तो आमच्या संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"