तिरुवनंतरपुरम : फलंदाजांच्या समाधानकारक कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मा-याच्या जोरावर भारताने निर्णायक टी२० सामन्यात न्यूझीलंडचा ६ धावांनी पराभव केला. या रोमांचक विजयासह भारताने तीन टी२० सामन्यांची मालिकाही २-१ अशी जिंकली. प्रत्येकी ८ षटकांचा खेळविण्यात आलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ बाद ६७ धावा काढल्या. धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ६ बाद ६१ धावांची मजल मारली.
गेल्या दोन दिवसांपासून येथे पडत असलेला मुसळधार पाऊस मंगळवारीही कायम होता. त्यामुळे ग्रीनफील्ड स्टेडीयमवर नाणेफेकीलाही उशीर झाला. शिवाय मैदान खूप ओले राहिल्याने सामना सुरु होण्यास अडचण येत होती. यामुळे पंचांनी मैदानाचे परिक्षण केल्यानंतर सामना प्रत्येकी ८ षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारताला मर्यादित धावसंख्येमध्ये रोखल्यानंतर न्यूझीलंड बाजी मारणार अशी चिन्हे होती. मात्र, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी अपेक्षेप्रमाणे टिच्चून मारा करत सामन्याचे चित्र पालटले. मार्टिन गुप्टिल (१), कॉलिन मुन्रो (७), कर्णधार केन विलियम्सन (८), ग्लेन फिलिप्स (११), हेन्री निकोल्स (२) यांना झटपट बाद करुन भारतीयांनी पकड मिळवली. कॉलिन डि ग्रँडेहोमे (१७*) याने अखेरपर्यंत किवी संघाच्या आशा कायम राखल्या होत्या. पण संघाला विजयी करण्यात तो अपयशी ठरला. कुलदीप यादवने पाचव्या षटकातील चौथ्या चेंडूवर एक बळी घेतला आणि त्याआधीच्या चेंडूवर विलियम्सन धावबाद झाला. हाच सामन्यातील निर्णायक क्षण ठरला.
तत्पूर्वी, किवी संघाने नियंत्रित मारा करताना भारतीय संघाला फटकेबाजीपासून दूर ठेवले. साऊदीने शिखर धवन (६) आणि रोहित शर्मा (८) यांना दुसºयाच षटकात माघारी परतावले. यानंतर कर्णधार विराट कोहलीने एक चौकार व एक षटकार ठोकत भारताच्या आशा उंचावल्या. परंतु आक्रमणाच्या नादात तो ईश सोढीचा बळी ठरला. कोहलीने ६ चेंडूत १३ धावा काढल्या. श्रेयश अय्यर (६) अपयशी ठरल्यानंतर मनिष पांड्ये (१७) आणि हार्दिक पांड्या (१५*) यांच्यामुळे भारताला समाधानकारक मजल मारता आली.
साऊदी आणि सोढी यांनी प्रत्येकी २ बळी घेत भारताला दडपणाखाली आणले. बोल्टने एक बळी घेतला. त्याचवेळी, पहिल्या दोन सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षण केलेल्या मिशेल सँटनर याने रोहित, धवन आणि मनिष यांचे अप्रतिम झेल घेत भारताला दबावाखाली आणण्याचे मोलाचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक :
भारत : रोहित शर्मा झे. सँटनर गो. साऊदी ८, शिखर धवन झे. सँटनर गो. साऊदी ६, विराट कोहली झे. बोल्ट गो. सोढी १३, श्रेयश अय्यर झे. गुप्टिल गो. सोढी ६, मनीष पांड्ये झे. सँटनर गो. बोल्ट १७, हार्दिक पांड्या नाबाद १४, महेंद्रसिंह धोनी ०. अवांतर - ३. एकूण : ८ षटकांत ५ बाद ६७ धावा. गोलंदाजी : टेÑंट बोल्ट २-०-१३-१; मिशेल सँटनर २-०-१६-०; टीम साऊदी २-०-१३-२; ईश सोढी २-०-२३-२.
न्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल त्रि. गो. भुवनेश्वर १, कॉलिन मुन्रो झे. रोहित गो. बुमराह ७, केन विल्यम्सन धावबाद (पांड्या) ८, ग्लेन फिलिप्स झे. धवन गो. कुलदीप ११; कॉलिन डि ग्रँडेहोमे नाबाद १७, हेन्री निकोल्स झे. अय्यर गो. बुमराह २, टॉम ब्रूस धावबाद (बुमराह/पांड्या) ५, मिशेल सँटनर नाबाद ३. अवांतर - ७. एकूण : ६ बाद ८ षटकांत ६१ धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार २-०-१८-१; जसप्रीत बुमराह २-०-९-२; यजुवेंद्र चहल २-०-८-०; कुलदीप यादव १-०-१०-१; हार्दिक पांड्या १-०-११-१.
Web Title: An exciting victory with India series in a decisive T20 match; 2-1 against New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.