सूरत : मिगनन डू प्रीझ (५९) हिच्या दमदार अर्धशतकानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला पहिल्या टी२० सामन्यात यजमान भारताविरुद्ध ११ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताने दिलेल्या १३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव १९.५ षटकात ११९ धावांत संपुष्टात आला.
लालाभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियममध्ये नाणेफेक जिंकून द. आफ्रिकेची कर्णधार सुन लूस हिने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आफ्रिकेने यजमानांना २० षटकात ८ बाद १३० धावांत रोखले. यानंतर भारताने आफ्रिकेची १४व्या षटकात ७ बाद ७३ अशी अवस्था केली. मात्र एका बाजूने टिकलेल्या प्रीझने ४३ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह ५९ धावांची खेळी करत संघाच्या आशा कायम राखल्या. अखेरच्या षटकात आफ्रिकेला १८ धावांची गरज असताना राधा यादवच्या पहिल्याच चेंडूवर प्रीझने षटकार मारला. मात्र यानंतर दोन चेंडू निर्धाव खेळल्यानंतर राधाने चौथ्या चेंडूवर प्रीझला व पाचव्या चेंडूवर एन. म्लाबा हिला बाद करुन भारताचा विजय साकारला. दीप्ती शर्माने अत्यंत भेदक मारा करत ८ धावांत ३ बळी घेत आफ्रिकेचे कंबरडे मोडले. शिखा पांड्ये, पूनम यादव व राधा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
तत्पूर्वी, कर्णधार हरमनप्रीत कौरने ३४ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह ४३ धावा केल्याने भारताने समाधानकारक मजल मारली. स्मृती मानधना (२१), जेमिमा रॉड्रिग्ज (१९) फारशी चमक दाखवू शकले नाही. पदार्पण करणारी १५ वर्षीय शेफाली वर्मा शून्यावर बाद झाली. शबनिम इस्माइल हिने २६ चेंडूत ३ बळी घेत भारताला रोखले.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकात ८ बाद १३० धावा (हरमनप्रीत कौर ४३, स्मृती मानधना २१; शबनिम इस्माइल ३/२६) वि.वि. दक्षिण आफ्रिका : १९.५ षटकात सर्वबाद ११९ धावा (मिगनन डू प्रीझ ५९; दीप्ती शर्मा ३/८, शिखा पांड्ये २/१८.)
Web Title: An exciting victory for Indian women
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.