लखनौ : द. आफ्रिकेविरुद्ध आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडे हिला वगळण्याचा निर्णय कठीण होता. मात्र, तिला संघाबाहेर केलेले नाही,’ असे भारतीय महिला क्रिकेट संघाचे उपकर्णधार हरमनप्रीत कौर हिने शुक्रवारी सांगितले.भारतीय महिला संघ द. आफ्रकेविरुद्ध रविवारपासून पाच वन डे व तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघ वर्षभरानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार आहे. शिखाला या मालिकेतील दोन्ही संघांत स्थान नाही. यामुळे खळबळ माजली. भारताच्या टी-२० संघाची कर्णधार असलेली हरमन म्हणाली, ‘हा कठीण निर्णय होता, याची मला जाणीव आहे. मात्र, कधी कधी अन्य खेळाडूंना संधी देणे गरजेचे असते. शिखाला बाहेरचा रस्ता दाखविलेला नाही. या मालिकेनंतर आम्ही संघ संयोजन पुन्हा निश्चित करणार आहोत. आगमी दोन-तीन वर्षे बरेच खेळायचे आहे.’३१ वर्षांच्या शिखाने ५० वन डे आणि ५२ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात तिने अनुक्रमे ७३ आणि ३६ गडी बाद केले. आगामी मालिकेबाबत बोलताना हरमन म्हणाली, ‘वर्षभर खेळापासून दूर होतो. मात्र, त्रास जाणवणार नाही. द. आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरीच्या बळावर आत्मविश्वास परत मिळवू. हा मोठा ब्रेक होता; पण काही गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. प्रत्येक स्पर्धा महत्त्वपूर्ण असल्याने विजयासह आत्मविश्वास मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत.’रविवारचा सामना हरमनचा १०० वा एकदिवसीय सामना असेल. ‘हा सामना चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा देणारा ठरेल, शंभराव्या सामन्याबाबत मला माहिती नव्हती,’ असे हरमनप्रीत कौरने सांगितले.
शेफालीचा समावेश नसल्याने आश्चर्य : एडुल्जीमागच्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात शानदार फलंदाजी करणारी युवा फलंदाज शेफाली वर्मा हिला द.आफ्रिकेविरुद्ध भारतीय वन डे संघात स्थान न मिळाल्याबद्दल माजी कर्णधार डायना एडुल्जी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. प्रशासकांच्या समितीेद्वारे बीसीसीआयचा ३३ महिने कारभार सांभाळणाऱ्या एडुल्जी यांनी स्मृती मानधना आणि शेफाली ही सर्वोत्कृष्ट सलामी जोडी असल्याचे मत व्यक्त केले.