India vs Australia : टीम इंडियानं मिळवलेल्या गॅबा कसोटीतील अशक्यप्राय विजयावर जगाला अजूनही विश्वास बसला नसेल कदाचित. अनेक संकटांचा सामना करताना अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आणि टीमनं ऑस्ट्रेलियावर २-१ असा मालिका विजय मिळवला आणि तोही त्यांच्याच घरच्या मैदानावर... २०१८-१९ मध्ये विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडियानं ७१ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती २०२०-२१ च्या मलिकेत अजिंक्यनं करून दाखवली. ब्रिस्बेन कसोटीत टीम इंडियानं ३ विकेट्स राखून विजय मिळवत मालिका खिशात घातली आणि या विजयानं मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचेही डोळे पाणावले. ड्रेसिंग रुममध्ये त्यांनी खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केलं.
रिषभ पंतनं विजयी चौकार मारल्यानंतर शास्त्रीही इमोशनल झाले. गॅबावर ऑस्ट्रेलियाला पराभूत करणाऱ्या भारतीय संघाला पाहून डोळ्यांत पाणी दाटून आल्याचे, शास्त्रींनी सांगितले. ३६ ऑल आऊट ते ऐतिहासिक मालिका विजय, यासाठी भारतीय खेळाडूंनी जो धाडस आणि दृढनिश्चय दाखवला, त्याचे शास्त्री गुरूजींनी कौतुक केले. ते म्हणाले,''तुम्ही माझ्या डोळ्यात पाणी आणलंत.. जे धाडस, जो निश्चय आणि जिंकण्याची वृत्ती तुम्ही दाखवतील, ते काल्पनिक आहे, याची तुम्हालाही जाण आहे. दुखापत होऊनही तुम्ही लढलात.. ३६ धावांवर ऑल आऊट झाल्यानंतरही तुम्ही स्वतःवरील विश्वास कायम ठेवलात.''
''हे धाडस एका रात्रीच येत नाही, त्यासाठी बराच कालावधी द्यावा लागतो. पण, आता तुमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि एक टीम म्हणून तुम्ही सामन्याचं चित्र बदललं हे तुम्हीही अनुभवलं आहे. आज फक्त भारतच नव्हे, तर संपूर्ण जग तुम्हाला सॅल्यूट करतंय. त्यामुळे आज जे तुम्ही केलंत ते कायम लक्षात ठेवा. या क्षणाचा मनमुराद आनंद लुटा. जेवढं शक्य होईल तेवढं एन्जॉय करा,''असे शास्त्री म्हणाले.
पाहा व्हिडीओ..
रिषभ पंत तू चाहत्यांना हार्ट अटॅकच आणला होतास
रिषभ पंतबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले, तू फलंदाजी करत असताना चाहत्यांना हार्ट अटॅकच आणला होतास. भारताच्या प्रत्येक घरात डॉक्टर्स उपलब्ध होते, परंतु तू जे काही केलंस ते अविश्वसनीयच आहे.'' कठीण प्रसंगी अजिंक्य रहाणेकडे टीम इंडियाचे नेतृत्व आले आणि त्यानं त्याच्या कौशल्याच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवून दिला. ''ज्या परिस्थितीत अजिंक्यकडे नेतृत्वाची जबाबदारी आली आणि त्यानंतर त्यानं जी मुसंडी मारली. परिस्थिती हाताळली, ते सर्व ब्रिलियंट होतं,''असे शास्त्री म्हणाले.