Join us  

Exclusive - टी २० विश्वचषक : भारत हा संभाव्य विजेताच, नंतर पसंती ऑस्ट्रेलियाला: ब्रॅड हॉग

ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणार आहे. यानिमित्ताने हॉगने ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 8:34 AM

Open in App

रोहित नाईक

मुंबई : ‘दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या टी-२० लीगसाठी आगामी ऑस्ट्रेलिया दौरा रद्द केला. त्यांनी नाईलाजाने हा निर्णय घेतला असला तरी, यामुळे मी निराश आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अचूक आंतरराष्ट्रीय वेळापत्रक बनवण्याची गरज आहे,’ असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी डावखुरा लेगस्पिनर ब्रॅड हॉग याने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणार आहे. यानिमित्ताने हॉगने ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.

टूरिझम वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हॉग म्हणाला की, ‘श्रीलंकेत कठीण परिस्थिती असतानाही ऑस्ट्रेलियाने श्रीलंका दौरा पूर्ण करत त्यांना खेळाच्या माध्यमातून आनंद देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे दडपण काही काळ कमी करण्याची संधी मिळाली. त्यामुळे खेळाचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतले जातात. आफ्रिका संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार नाही, पण भविष्यात असे प्रसंग होऊ न देण्यासाठी आंतरराष्ट्रीय वेळापत्रक अधिक चांगल्याप्रकारे तयार करावे लागेल.’

टी-२० विश्वचषकातील संभाव्य अव्वल चार संघांविषयी हॉगने सांगितले की, ‘भारतीय संघ नक्कीच संभाव्य विजेता आहे. त्यानंतर माझी पसंती ऑस्ट्रेलियाला आहे. दोन्ही संघांची फलंदाजी अत्यंत मजबूत असून गोलंदाजीही समतोल आहेत. त्यानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंड भक्कम वाटतात. तसेच, वेस्ट इंडिजलाही कमी लेखून चालणार नाही. त्यांच्यामध्ये कोणालाही धक्का देण्याची क्षमता आहे.’ 

आयसीसीच्या नव्या धोरणानुसार आता जवळपास प्रत्येक वर्षी क्रिकेटप्रेमींना जागतिक स्पर्धेचा आनंद मिळणार आहे. याबाबत हॉगने म्हटले की, ‘आयसीसीने जगभरात क्रिकेटचा प्रसार केला.  क्रिकेटची रोमांचकता वाढली. ५० षटकांचा विश्वचषक, जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी), टी-२० विश्वचषक, महिला विश्वचषक अशा एकामागून एक विश्व स्पर्धांचे आयोजन क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.  पण शेवटी कसोटी क्रिकेट हे मूळ आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पुढची पिढी घडविण्यासाठी कसोटी क्रिकेट महत्त्वाचे ठरणार आहे.’ 

म्हणून ऑस्ट्रेलियाला भारताचे आव्हानगेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियाने आशिया खंडात पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका मिळवली, तर श्रीलंकेविरुद्ध बरोबरी साधली. मात्र, भारतात कांगारूंना पराभव पत्करावा लागला. भारताविरुद्धच्या आव्हानाविषयी हॉग म्हणाला की,  ‘भारतीय संघ तंदुरुस्तीच्या बाबतीत खूप वरचढ ठरत आहे. ऑस्ट्रेलियातही त्यांची तंदुरुस्ती निर्णायक ठरली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना क्षेत्ररक्षणातील चुकांचाही फटका बसला. यामध्ये मोठी सुधारणा करावी लागेल.’

टॅग्स :आॅस्ट्रेलियाटी-20 क्रिकेटभारत
Open in App