मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा सध्याच्या घडीला अव्वल गोलंदाज आहे. पण अजूनही बुमराच्या गोलंदाजीमध्ये काही गोष्टींची थोडू कसूर जाणवते. बुमराने जर फक्त हा बदल केला, तर त्याची गोलंदाजी अधिक भेदक होऊ शकतो, असे भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान सांगत होता. टी-10 लीगच्या निमित्ताने झहीरने ‘लोकमत डॉट कॉम’शी खास बातचीत केली. यावेळी बुमराने गोलंदाजीमध्ये कोणता बदल करायला हवा, हे झहीरने सांगितले.
झहीर म्हणाला की, “ बुमराचा प्रोग्रेस फार चांगला आहे. फार कमी कालावधीमध्ये तो भरपूर काही शिकला आहे. त्यामुळे यापुढेही तो असंच करत राहीलं, अशी आशा आहे. पण बुमराने जर स्विंगवर अजून फोकस करायला हवा. बुमरा जर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चेंडू आऊट स्विंग करायला लागला तर त्याच्या गोलंदाजीची धार वाढत जाईल. कारण त्याच्याकडे गोलंदाजी शैलीचा अॅडवांटेज आहे. कारण तो ज्या अँगलने चेंडू टाकतो, ते फलंदाजांना कळत नाही. त्याचबरोबर स्विंग करायला लागला, तर तो फलंदाजाला चांगलं हतबल करू शकेल.”
टी-10 लीगबाबत झहीर म्हणाला की, “ टी-10 अजून वाढते आहे. बाकिच्या देशांमध्ये हे क्रिकेट चांगलं वाढतंय. अजून अशा लीग खेळवल्या गेल्या पाहिजेत. जास्त टीम येतात तेव्हा खेळ वाढत असतो. टी-10 जेव्हा जास्त देश खेळतील आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा वाढेल. तेव्हा हा खेळ मोठा होईल.”
गांगुली अधिक आक्रमक की कोहली; सांगतोय झहीर खानभारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहली हा सर्वात आक्रमक असल्याचे म्हटले जाते. पण भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमकता आणली ती माजी कर्णधार सौरव गांगुलीने. त्यामुळे गांगुली अधिक आक्रमक की विराट, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण या दोघांना चांगल्यापद्धतीने ओळखणारा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने हे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर आक्रमकपणाचा खेळावर परीणाम व्हायला नको, असेही झहीरने सांगितले आहे.
आतापर्यंत बऱ्याच कर्णधारांबरोबर झहीर खेळला आहे. त्यामुळे या कर्णधारांचे स्वभाव आणि नेतृत्व करण्याची क्षमता कशी होती, याबाबतही झहीरने आपले मत व्यक्त केले. याबाबत झहीर म्हणाला की, " गांगुली असताना माझा सुरुवातीचा काळ होता. त्यावेळी तेव्हा त्याने माझा आत्मविश्वास कसा उंचावेल, हे पाहिलं. अनिल कुंबळे हा स्वत: एक गोलंदाज होता. त्यामुळे गोलंदाजाला नेमकं काय हवंय, ते त्याला चांगलं समजत होतं. धोनी कर्णधार असताना मी अनुभवी गोलंदाज होतो. त्यामुळे काही वेळा तो माझ्यावरही अवलंबून असायचा. धोनी कर्णधार असताना युवा गोलंदाजांना मला मार्गदर्शन करायला मिळालं."
गांगुली आणि कोहली यांच्यामध्ये जास्त आक्रमक कोण, असा प्रश्न विचारल्यावर झहीर म्हणाला की, “ गांगुली आणि कोहली यांच्यामध्ये आपण तुलना करू शकत नाही. कारण प्रत्येक क्रिकेटपटूची एक वेगळी स्टाईल असते. जेव्हा सौरव कर्णधार होता, तेव्हा आमचे ध्येय होते की, विदेशामध्ये सातत्याने सामना जिंकण्यावर भर द्यायचा. आम्ही हे ध्येय पूर्णही केलं होतं. ही गोष्ट प्रत्येक दशकानुसार पाहायला हवी. गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी आणि आता विराट कोहली हे कर्णधार असताना आतापर्यंतचा संघाचा आलेख पाहिला तर तो उंचावत गेला आहे. खेळाडू म्हणून अग्रेसिव्हनेस किती महत्वाचा. अग्रेसिव्हनेसने तुमच्या खेळावर परीणाम झाला नाही पाहिजे. काही खेळाडू काहीच बोलत नाहीत. जसा चेतेश्वर पुजारा आहे. पुजाराला किती कुणी बोललं तरी तो त्याकडे लक्ष देत नाही. पण कोहली जेव्हा अग्रेसिव्ह होतो तेव्हा त्याच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यामध्येही वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात.’’