पर्ल : पहिल्या दोन्ही सामन्यांत सलामी जोडीच्या अपयशानंतर भारतीय संघाला गुरुवारी यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात आघाडीच्या सर्वच फलंदाजांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. भारताने पहिला सामना सहज जिंकल्यानंतर यजमान संघाने मंगळवारी दुसऱ्या सामन्यात भारताचा आठ गडी राखून सहज पराभव करीत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी असल्याने ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन या सलामीवीरांना धडाकेबाज सुरुवात करावी लागेल. साई सुदर्शनने दोन्ही सामन्यांत ५५ आणि ६२ धावांचे योगदान दिले. गायकवाड मात्र ५ आणि ४ धावा काढून परतला होता. सलामी जोडीने पहिल्या सामन्यात २३ आणि दुसऱ्या सामन्यात चार धावांची भागीदारी केली. याउलट, यजमान संघाकडून सलामीवीर टोनी झोर्जी याने पहिले शतक ठोकले तर रीझा हेंड्रिक्सने ५२ धावांची खेळी केली.
भारताचा युवा फलंदाज तिलक वर्मा स्वत:च्या भूमिकेला न्याय देताना दिसत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेपाठोपाठ द. आफ्रिकेविरुद्धही तो अपयशी ठरला. मधल्या फळीत श्रेयस अय्यर नसल्याने सलामीवीरांना जबाबदारी स्वीकारावी लागेल. ३० वर्षांचा रजत पाटीदार याला चौथ्या स्थानावर खेळविले जाऊ शकते. बोलॅन्ड पार्कची खेळपट्टी फलंदाजांना पूरक मानली जाते. यामुळे फलंदाज मोकळेपणे खेळू शकतात. संघ व्यवस्थापन संजू सॅमसन याला आणखी एक संधी देऊ शकते. तो मागच्या सामन्यात १२ धावा काढून परतला. तर वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला दोन्ही सामन्यांत एकही गडी बाद करता आला नाही.
गोलंदाजीत अर्शदीप आणि आवेश खान हे पहिल्या दोन्ही सामन्यांत सरस ठरले होते. त्यांच्यासोबत अनुभवी लेगस्पिनतर युझवेंद्र चहल याला संधी मिळू शकते. अशावेळी कुलदीप यादव किंवा अक्षर पटेल यापैकी एकाला बाहेर बसावे लागेल. द. आफ्रिका संघात झार्जीच्या कामगिरीमुळे उत्साह आहे. क्विंटन डिकॉक याचा पर्याय गवसल्याची संघाची भूमिका असून, वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गर यानेदेखील लक्षवेधी कामगिरी केली आहे.
आम्ही ५०-६० धावांनी कमी पडलो : राहुल दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आठ गड्यांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार लोकेश राहुल म्हणाला की, सुरुवातीला खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळत होती. त्यामुळे नाणेफेकीचा कौल गमावणे आम्हाला महागात पडले. भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात ४६.२ षटकांत २११ धावांपर्यंतच मजल मारू शकला. दक्षिण आफ्रिकेने सलामीवीर टोनी डी झार्जी याच्या पहिल्या शतकाच्या जोरावर आठ गडी राखून सहज विजय मिळवला व मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सामन्याच्या सुरुवातीला खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती. त्यामुळे भारतीय फलंदाजांसमोर आव्हानात्मक परिस्थिती होती. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीवेळी खेळपट्टी थोडी संथ झाली. त्यामुळे यजमान संघाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा संयमाने सामना केला. राहुल म्हणाला की, आम्ही ५०-६० धावा कमी केल्या आणि पाचव्या षटकांत मुकेश कुमारच्या चेंडूवर रीझा हेंड्रिक्सचा झेल सोडणे महागात पडले. हेंड्रिक्सने ८१ चेंडूंत ५२ धावा केल्या. तसेच, त्याने झार्जीच्या साथीत १३० धावांची सलामी दिली आणि सामना भारतापासून दूर नेला. सामन्यानंतर राहुल म्हणाला की, नाणेफेक गमावणे वाईट होते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना फायद्याची ठरली. त्यामुळे फलंदाजी करणे आव्हानात्मक होते. आमच्या काही फलंदाजांनी चांगली सुरुवात केली; पण त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. आम्ही शेवटच्या षटकापर्यंत खेळलो असतो तर आणखी ६० धावा निघाल्या असत्या. संघातील प्रत्येक खेळाडूला त्याची भूमिका माहीत आहे. तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. मी माझी भूमिका निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही संघासाठी सर्वोत्तम कामगिरीचा विचार करत असाल तर चूक किंवा बरोबर, या कोड्यात अडकण्यात अर्थ नाही, असेही राहुल म्हणाला.