भारताने अमेरिकेपाठोपाठ कॅरेबियन धर्तीवर वेस्ट इंडिजविरुद्ध दणदणीत कामगिरीसह दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकून जागतिक कसोटी मालिकेत सुरुवातीला आघाडी मिळविली आहे. भारतीय संघाच्या या कामगिरीचे कौतुक करावे तितके थोेडेच. हनुमा विहारीची फलंदाजीतील आणि जसप्रीत बुमराहची गोलंदाजीतील कामगिरी अप्रतिम अशीच होती.
मी विहारीची कारकीर्द जवळून न्याहाळली. प्रथमश्रेणी सामन्यादरम्यान संयम आणि मानसिकता पाहून कसोटी क्रिकेटमध्ये तो चमकेल, असे भाकीतही केले होते. स्वत:च्या अनुभवावरून सांगावेसे वाटते की, सहाव्या स्थानावर फलंदाजीला येणे सोपी गोष्ट नाही. तथापि, विहारीने प्रत्येक वेळी कसोटी फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध केले. खेळपट्टीवर तो फार शांत आणि मुरब्बी वाटतो. फिरकीपटूंवर वर्चस्व गाजवीत तो फुटवर्कसह खेळतो तसेच वेगवान माऱ्यापुढेही डगमगत नाही. मी त्याच्याकडून अधिक मोठ्या कामगिरीची अपेक्षा बाळगून आहे.बुमराहमध्ये दीर्घकाळ कामगिरी करण्याची क्षमता आहे. स्वत:च्या शैलीवर कमालीचे वर्चस्व असलेला हा खेळाडू सामन्यागणिक स्वत:च्या कामगिरीत सुधारणा करीत आहे. वेगवान माºयाचे नेतृत्व बुमराह करीत असताना इशांतनेही गेल्या काही वर्षांत गोलंदाजीत सातत्य दाखविले. इशांत बळीदेखील घेत आहे. इशांत आणि शमी हे अनुुभवी गोलंदाज असून, सोबतीला बुमराह लाभल्याने विश्व क्रिकेटमध्ये भारतीय वेगवान मारा कमालीचा भक्कम ठरला, यात शंका नाही.भारताच्या दृष्टीने मालिकेत अनेक सकारात्मक बाबी घडल्या. फलंदाजीत मात्र काही प्रश्न निर्माण झाले. चेतेश्वर पुजाराने घोर निराशा केली. त्याहीपेक्षा मोठी चिंता लोकेश राहुलबद्दल आहे. राहुलच्या कर्तृत्वावर शंका घेण्याचे कारण नाही. त्याला अनेक संधी दिल्या, पण कसोटी क्रिकेटमध्ये अद्याप स्वत:ला सिद्ध करता आले नाही. त्याच्याकडून आणि रिषभ पंतकडून संघाला बºयाच अपेक्षा आहेत. भविष्यात दोघांनीही फलंदाजीत आणि यष्टिरक्षणात स्वत:ची कामगिरी उंचवायलाहवी.वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचेही प्रयत्न नजरेआड करता येणार नाहीत. पण फलंदाजीत या संघाने कौशल्य तसेच मानसिकता गमावली आहे. वारंवार चुका केल्याने निराशा वाढते. त्यासाठी भूतकाळातील अनुभवापासून बोध घेत चांगल्या कामगिरीकडे अग्रेसर व्हायला हवे. दुर्दैवाने दोन्ही सामन्यात चारही डावांत यजमान फलंदाजांकडून अशी कुठलीही कृती पाहायला मिळाली नाही.