Join us  

वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय फलंदाजांना लय गवसण्याची अपेक्षा

उसळी घेणाऱ्या न्यूझीलंडमधील या खेळपट्ट्यांशी लवकरात लवकर जुळवून घेण्याचे कसब भारतीय महिलांना आत्मसात करावे लागेल, तर स्पर्धेतील पुढील वाटचाल सुखकर होऊ शकते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 5:30 AM

Open in App

हॅमिल्टन : सध्या धावांसाठी झगडत असलेल्या भारतीय महिला फलंदाजांकडून आजच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. न्यूझीलंडकडून ६२ धावांनी पराभव झाल्यामुळे भारतीय संघ सध्या पाचव्या स्थानावर घसरला आहे. त्यामुळे सलग दुसरा पराभव स्वीकारणे भारतीय महिला संघाला महागात पडू शकते. 

उसळी घेणाऱ्या न्यूझीलंडमधील या खेळपट्ट्यांशी लवकरात लवकर जुळवून घेण्याचे कसब भारतीय महिलांना आत्मसात करावे लागेल, तर स्पर्धेतील पुढील वाटचाल सुखकर होऊ शकते. 

स्मृती मानधना, मिताली राज, यास्तिका भाटिया आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा या फलंदाज न्यूझीलंडविरुद्ध अपशयी ठरल्या होत्या. त्यामुळे २६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हरमनप्रीतला (७१ धावा) इतर कोणाची साथ मिळू न शकल्याने भारताला ६२ धावांनी पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात शेफाली वर्मा अंतिम अकरामध्ये पुनरागमन करू शकते. तिच्याकडून सलामीला वेगाने धावा करण्याची अपेक्षा संघ व्यवस्थापनाला असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने १६२ चेंडू निर्धाव खेळले होते. त्यामुळेच धावगतीचा दबाव वाढून फलंदाज बाद झाल्या.

विश्वचषकातील भारतीय संघासमोरील आव्हानांविषयी बोलताना प्रशिक्षक रमेश पोवार म्हणाले की, विश्वचषकाचा तणाव मी समजू शकतो. मात्र अशा स्पर्धांमध्ये कुठलाही बहाणा चालत नसतो. तुम्हाला चांगली कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही. कारण यासाठीच आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून सराव करतो आहे. वेस्ट इंडिजने आपल्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडला पराभूत केले होते. त्यामुळे त्या पूर्ण आत्मविश्वासाने या सामन्यात भारतासमोर तगडे आव्हान पेश करू शकतात.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ
Open in App