- सौरव गांगुली : वेस्ट इंडिजवर भारताचे वर्चस्व अबाधित असून ते पुढेही कायम राहण्याची अपेक्षा आहे. याआधी विश्वचषक व इंग्लंडविरुद्धच्या स्थानिक मालिकेत चांगल्या कामगिरीमुळे यजमान संघाकडून काही अपेक्षा होत्या, पण त्या धुळीस मिळाल्या.सध्याच्या कॅरेबियन संघात अनेक युवा व प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. लुईस, पूरण, हेटमायर, होप या सर्वांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. एकवेळ अशी होती की क्रिकेटवर त्यांचा वरचष्मा होता. सध्याचे युवा खेळाडू आणि कर्णधार होल्डर यांच्याकडे पाहिल्यास त्यांच्यात नाजूक स्थितीवर मात करण्याची उणीव जाणवते. दोन्ही संघात हाच फरक आहे. स्थितीनुरूप स्वत:ला सज्ज करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे.सर्वांत आधी कर्णधार कोहलीचा विचार करू. मी पहाटे ३ वाजेपर्यंत जागून कोहलीच्या विश्व दर्जाच्या फलंदाजीचा आनंद लुटला. त्याच्या कामगिरीत सातत्य आहे. शानदार कारकीर्दीत तो सर्वांना मागे टाकेल, अशी मला खात्री आहे. श्रेष्ठ खेळाडूंच्या यादीत मी दुसऱ्या स्थानावर श्रेयस अय्यर याला पाहतो. मी श्रेयसला दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना पाहिले, पण विंडीजमध्ये त्याच्या कामगिरीत फार बदल झालेला दिसतो. या युवा खेळाडूकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. कोहलीसारख्या चॅम्पियन कर्णधाराच्या मार्गदर्शनात श्रेयसने आपली खेळी शतकांत बदलायला हवी. श्रेयसने चौथ्या स्थानावर दावेदारी सादर केली असली, तरी त्यात सातत्य दाखवावे. हे असेस्थान आहे जेथे भारतासह सर्व दिग्गज संघांच्या खेळाडूंनी सरस कामगिरी केली आहे. भारतीय चाहत्यांना हीच अपेक्षा आता अय्यरकडून बाळगता येईल.
(गेम प्लान)