Join us  

यंग ब्रिगेडकडून अपेक्षा! कोहलीच्या फॉर्मची चिंता; ७ जण प्रथमच कसोटी खेळणार

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे पहिला कसोटी सामना खेळला जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 7:54 AM

Open in App

नवी दिल्ली :भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे पहिला कसोटी सामना खेळला जाईल. यासाठी भारतीय संघात ज्यांची निवड झाली त्यात सात जण प्रथमच येथे कसोटी सामना खेळतील. या खेळाडूंमध्ये पाच चेहरे असे आहेत की ज्यांनी आधीही स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली. आता आफ्रिकेत कामगिरीची पताका उंचाविण्याचा प्रयत्न करणार आहेत.

 कोच राहुल द्रविड यांच्या मते आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर कामगिरी करणे फारच कठीण असते. दुसरीकडे कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे  यांची बॅट काही महिन्यांपासून तळपलेली नाही. अशा वेळी भारतीय संघाला अपेक्षा असेल ती ‘यंग ब्रिगेड’कडूनच! भारताने २९ वर्षांपासून आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही.

 श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध संपलेल्या कसोटी मालिकेत फलंदाजीत कमाल केली. त्याचा हा पहिला आफ्रिका दौरा आहे. कानपूरमध्ये पदार्पणी सामना खेळणाऱ्या श्रेयसने १५७ धावा ठोकल्या होत्या. त्याने दोन सामन्यांत २०२ धावा केल्या. पदार्पणात शतक ठोकणारा तो भारताचा १६ वा फलंदाज बनला.  द. आफ्रिकेविरुद्ध २०१९-२० ला स्थानिक मालिकेत धावांचा पाऊस पाडणारा मयंक अग्रवाल हा पहिल्यांदा आफ्रिकेत खेळेल. स्थानिक मालिकेत मयंकने तीन सामन्यांत २४० धावा केल्या होत्या. सर्वाधिक २१५ धावांची खेळी करीत त्याने दुहेरी शतकाचीही नोंद केली होती. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत त्याने मुंबई कसोटीत १५० धावा ठोकल्या. जखमी रोहित शर्माचा पर्याय म्हणून मयंककडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.

 मोहम्मद सिराज हा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलिया तसेच इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर फारच धोकादायक ठरला. द. आफ्रिकेच्या धर्तीवर तो प्रथमच खेळेल. दहा सामन्यांत त्याने ३३ गडी बाद केले असून बुमराह आणि शमीच्या सोबतीने आफ्रिकेच्या फलंदाजांना त्रस्त करू शकेल. रवींद्र जडेजा जखमी असल्याने आफ्रिका दौऱ्याबाहेर झाला. अशावेळी अष्टपैलू शार्दूल ठाकूर महत्त्वपूर्ण खेळाडू सिद्ध होऊ शकेल. शार्दूल आफ्रिका दौऱ्यावर प्रथमच आला आहे. 

भारतासाठी चार कसोटीत १४ गडी 

बाद करणाऱ्या शार्दूलने १९० धावा देखील काढल्या आहेत. वेगवान गोलंदाजीसह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या धर्तीवर त्याची बॅट देखील तळपली होती. ऋषभ पंत ऑस्ट्रेलियात उपयुक्त ठरला. आता द. आफ्रिकेत कसोटी खेळणार आहे. सिडनीत त्याने ९७ आणि गाबा मैदानावर नाबाद ८९ धावा ठोकल्यामुळे वेगवान खेळपट्ट्यांवर तो धोकादायक फलंदाज मानला गेला. २०१८ च्या ओव्हल कसोटीत त्याने राहुलसह इंग्लंडचा मारा चांगलाच फोडून काढला होता. तो सामना भारताने गमावला तरीही पंतच्या झुंजार खेळीची सर्वत्र चर्चा झाली होती. आफ्रिकेत पहिल्यांदा मालिका जिंकायची झाल्यास या खेळाडूंची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल.‘ 

टॅग्स :भारतद. आफ्रिका
Open in App