Join us  

एक्स्पर्ट व्ह्यू। सर्वोत्तम खेळाडूसाठीही एखादा सामना वाईट ठरतो

राहुल, संजू, रोहित, पृथ्वी यांची लक्षवेधी खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 1:32 AM

Open in App

अयाज मेमन

आयपीएलचा पहिला आठवडा संपला. याआधीच्या सत्रांप्रमाणेच, यंदाच्या आयपीएलमध्येही प्रत्येक संघांच्या बाबतीत अनेक चढ-उतार अनुभवण्यास मिळतील हे नक्की. सध्या स्पर्धेत बरेच क्रिकेट शिल्लक असून, आत्ताच खोलात जाऊन विश्लेषण करणे एकतर्फी ठरेल. याउलट मी, काही भारतीय खेळाडूंच्या दमदार कामगिरी आणि त्यांना आलेल्या अपयशावर एक नजर टाकेन.

आतापर्यंत झालेल्या सामन्यांत लोकेश राहुल, संजू सॅमसन, रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ यांची कामगिरी शानदार झाली आहे. राहुलच्या जबरदस्त शतकामुळे पंजाबने आरसीबीचा धुव्वा उडवला. यामुळे पंजाबच्या संघाला पहिल्या सामन्यात दिल्लीविरुद्ध झालेल्या निसटत्या पराभवाच्या आठवणी मागे टाकता आल्या. पृथ्वी शॉनेही आपल्या पहिल्या सामन्यात ज्या प्रकारे विकेट फेकली, त्यामुळे कर्णधार आणि चाहत्यांची मोठी निराशा झाली होती. मात्र यानंतर त्याने शानदार पुनरागमन करताना चेन्नईविरुद्ध मॅचविनिंग अर्धशतक झळकावले. त्याचप्रमाणे चेन्नईविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर कोलकाताविरुद्ध रोहितने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत कसोटी क्रमवारीतील अव्वल गोलंदाज असलेल्या पॅट कमिन्ससह इतर गोलंदाजांचा निडरपणे सामना केला. कमिन्स आयपीएलमधील सर्वांत महागडा खेळाडू असल्याचे विसरून चालणार नाही.मात्र, माझ्या मते सर्वोत्तम खेळी केली ती संजू सॅमसन याने. त्याने ३२ चेंडूंत ७४ धावा करत चेन्नईविरुद्ध जबरदस्त हल्ला चढवला. सॅमसनच्या क्षमतेबाबत कधीच शंका नव्हती; खेळातील सातत्याच्या असलेल्या अभावामुळे तो भारतीय संघातून आत-बाहेर झाल्याचे दिसून आले. चेन्नईविरुद्ध केवळ विजयच मिळवून दिला नाही, तर सॅमसनने भारतीय संघात धोनीचा वारसदार म्हणून शर्यतीत असल्याचे सिद्ध केले.राहुल तेवटिया राजस्थानसाठी स्टार ठरत आहे. पण याहून अधिक प्रभावशाली ठरला तो पंजाबचा २० वर्षीय लेगस्पिनर रवी बिश्नोई. अनिल कुंबळेसारखा दिग्गज लेगस्पिनर संघाचा प्रशिक्षक आणि मेंटॉर असल्याचा मोठा फायदा बिश्नोईला मिळणार आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी मोहिमेची सुरुवात विजयाने केली; मात्र यानंतर पराभवाचा सामना करावा लागला. धोनीसाठी फलंदाजीचा क्रमांक अडचणीचा मुद्दा ठरत आहे.गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीने अचूक मारा केला. स्विंग आणि सीमच्या जोरावर तो फलंदाजांना अडचणीत आणतोय. तो सध्या आपल्या तुफान फॉर्ममध्ये असून पंजाबसाठी मुख्य अस्त्र ठरत आहे. अशाच कामगिरीची अपेक्षा भारतीयांना आरसीबीकडून खेळणाऱ्या नवदीप सैनीकडून आहे. फिरकीपटूंमध्ये लेगस्पिनर लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये सर्वांत यशस्वी ठरला तो युझवेंद्र चहल. लेग ब्रेक्स आणि गुगली यांच्या मिश्रणाने तो फलंदाजांना नाचवतोय. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल