भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरला सुरू होणार आहे. ज्यांना कुणाला माहीत नाही, त्यांना हे सांगू इच्छितो की ही 'बॉक्सिंग डे' कसोटी आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर प्रत्येक वर्षी २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत बॉक्सिंग डे कसोटीचं आयोजन केलं आहे. पण, या कसोटीला बॉक्सिंग डे कसोटी का म्हणातात, हे माहित्येय?ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या या कसोटीला बॉक्सिंग डे कसोटी म्हणातात. बॉक्सिंग डे कसोटीचा बॉक्सिंग खेळाशी काही संबंध नाही. जगभरातील अनेक देशात ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवस जेव्हा लोकं मित्र आणि नातेवाइकांना भेटतात तेव्हा बॉक्समध्ये काही गिफ्ट देतात. त्यामुळे या दिवसाचे नाव ख्रिसमस बॉक्सवरून दिले गेले.
१२८ वर्ष जुनी परंपराइंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व कॅनडा या राष्ट्रकुल देशांमध्ये ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी बॉक्सिंग डे असे म्हटले जाते. बॉक्सिंग डे आणि क्रिकेट यांचा १२८ वर्ष जुना इतिहास आहे. १८९२ साली शेफील्ड शील्ड क्रिकेट स्पर्धेचा एक सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर झाला. यात व्हिक्टोरिया आणि न्यू साउथ वेल्स यांच्यात ख्रिसमसच्या दरम्यान क्रिकेट सामना खेळवण्याची सुरूवात झाली. मेलबर्नमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना १९५० मध्ये झाला. हा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झाला. ती मॅच २२ डिसेंबर रोजी झाली होती. पण हळूहळू बॉक्सिंग डे क्रिकेटचा भाग झाला.
१९८०च्या आधी मेलबर्नमध्ये फक्त चार ( १९५२, १९६८, १९७४ आणि १९७५ ) बॉक्सिंग डे सामने झाले होते. त्या शिवाय अॅडिलेड येथे १९६७, १९७२ आणि १९७६ साली बॉक्सिंग डे सामने झाले. १९७५ साली वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीत लक्षात आले की बॉक्सिंग डे कसोटी मॅच मोठी होऊ शकते. ती मॅच पाहण्यासाठी ८५ हजार प्रेक्षक आले होते. त्यानंतर बॉक्सिंग डे दिवशी कसोटी मॅच सुरू करण्याची परंपरा सुरू झाली. बॉक्सिंग डे कसोटी फक्त ऑस्ट्रेलियाच नव्हे, तर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतही खेळवली जाते.
१९१३ मध्ये जोहान्सबर्ग येथे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 'बॉक्सिंग डे टेस्ट मॅच'ची सुरुवात झाली होती. पण दुसरा 'बॉक्सिंग डे' कसोटी सामना त्यानंतर ४८ वर्षांनी खेळवण्यात आला होता.