SA vs BAN, T20 World Cup 2022 Video: दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील T20 World Cup 2022 विश्वचषक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला. पहिल्या सामन्यात पावसाने दगाफटका केल्यामुळे, या सामन्यात मोठा विजय मिळवणे आफ्रिकेसाठी महत्त्वाचे होते. पण मजेदार गोष्ट म्हणजे बांगलादेशचा यष्टिरक्षक नुरुल हसनने या सामन्यात मैदानावर असे काही केले की त्याचा फटका त्यांच्याच संघाला बसला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना बांगलादेशच्या यष्टीरक्षकाच्या एका चुकीमुळे विरोधी संघाला ५ धावा मोफत मिळाल्या.
नक्की काय घडलं?
बांगलादेशचा फिरकीपटू शाकिब अल हसन गोलंदाजी करत होता. ११व्या षटकातील शेवटचा चेंडू नो बॉल टाकला गेला. त्यामुळे त्याला शेवटचा चेंडू फ्री हिट म्हणून टाकावा लागला. फ्री हिटवर, बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन गोलंदाजी करणार होता, तेव्हा यष्टिरक्षक नुरुल हसनने चेंडू टाकण्याच्या वेळी अतिउत्साहाच्या भरात चपळता दाखवण्याचा प्रयत्न केला. पण तिथेच त्याची चूक झाली. पंचांनी त्याची ही कृती बरोबर पकडली. शाकिब अल हसनच्या गोलंदाजीच्या रन-अप दरम्यान नुरुल हसन आपली जागा बदलताना दिसला. खेळाच्या नियमांनुसार या गोष्टीला परवानगी नाही. पाहा Video-
गोलंदाजी करताना यष्टीरक्षकाला स्थान बदलण्याची परवानगी नसते. त्याला एका जागी स्थिर उभे राहावे लागते. जर कोणी असे करताना आढळले, तर त्या चुकीचा भुर्दंड संपूर्ण टीमला भोगावा लागतो. नुरुल हसनच्या बाबतीत असं घडल्यानंतर अंपायर रॉड टकरनेही ही बाब निदर्शनास आणून दाखवली आणि बांगलादेशवर पाच धावांचा दंड ठोठावला. परिणामी, आफ्रिकेला ५ धावा मोफत मिळाल्या.
दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॅली रुसोच्या १०९ आणि डी कॉकच्या ६३ धावांच्या जोरावर आफ्रिकन संघाने ५ विकेट गमावून २०५ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची फलंदाजी पत्त्यांसारखी कोसळली आणि संपूर्ण संघ १६.३ षटकांत १०१ धावांत सर्वबाद झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने हा सामना १०४ धावांनी जिंकला.