Join us  

नेपाळने इतिहास घडविला, वन डे वर्ल्ड कप २०२३ साठी १४ संघांशी भिडणार; ३ जागांच्या शर्यतीत माजी विजेता

The path to Cricket World Cup 2023 : यजमान भारतासह सात संघ वर्ल्ड कप २०२३ साठी पात्र ठरले आहेत आणि आता उर्वरित ३ जागांसाठी १५  संघांमध्ये स्पर्धा रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 6:12 PM

Open in App

The path to Cricket World Cup 2023 : यंदाच्या वर्षात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. यजमान भारतासह सात संघ वर्ल्ड कप २०२३ साठी पात्र ठरले आहेत आणि आता उर्वरित ३ जागांसाठी १५  संघांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. नेपाळने नुकत्याच झालेल्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीवर DLS नुसार विजय मिळवताना वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत जागा पक्की केली. नेपाळ क्रिकेटसाठी हा ऐतिहासिक दिवस ठरला आणि आता त्यांच्यासमोर माजी विजेत्यांसह तगड्या संघाचे आव्हान आहे. नेपाळला १४ प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देऊन मुख्य फेरीचा मार्ग गाठायचा आहे.

क्रिकेट मॅच पाहण्यासाठी तुडूंब गर्दी; नेपाळने UAE ला नमवून घडविला इतिहास 

३२ संघांपैकी १० संघांनी २०१९मध्येच मुख्य स्पर्धेचे दार ठोठावले होते आणि त्यापैकी ७ संघ २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. क्वालिफायर आणि क्लालिफायर प्ले ऑफ यांच्यातून आता उर्वरित संघ ठरणार आहेत. भारत, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांनी २०२३ वर्ल्ड कप स्पर्धेमधील स्थान पक्के केले आहे.वर्ल्ड कप सुपर लीग स्पर्धेतील आठ संघ थेट पात्र ठरणार आहेत. जागतिक क्रिकेटमधील अव्वल १३ संघांमध्ये मागील तीन वर्षांपासून ही स्पर्धा सुरू होती. 

 

इंग्लंड सर्वाधिक १५५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ न्यूझीलंड ( १५०), भारत( १३९), बांगलादेश ( १३०), पाकिस्तान ( १३०), ऑस्ट्रेलिया ( १२०) आणि अफगाणिस्ता ( ११५) असा क्रमांक येतो. आठव्या क्रमांकासाठी सध्या वेस्ट इंडिज ८८ गुणांसह आघाडीवर आहे. सुपर लीगमधील पाच संघ झिम्बाब्वे येते १८ जून पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेत खेळणार आहेत. सुपर लीगमधील एका स्थानासाठी वेस्ट इंडिज, श्रीलंका, आयर्लंड व दक्षिण आफ्रिका शर्यतीत आहेत. श्रीलंका ( ७७) व आयर्लंड ( ६८) यांचे प्रत्येकी तीन सामने शिल्लक आहेत आणि त्यांना वेस्ट इंडिजला मागे टाकण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेचेही ( ७८) दोन सामने नेदरलँड्सविरुद्ध होणार असल्याने तेही शर्यतीत आहेत.

क्वालिफायरमध्ये झिम्बाब्बे, नेदरलँड्स, स्कॉटलंड, ओमान आणि नेपाळ यांनी स्थान पक्के केले आहे. क्वालिफायर प्ले ऑफमध्या नामिबिया, अमेरिका, पीएनजी, संयुक्त अरब अमिराती, जर्सी व कॅनडा यापैकी दोन संघ ( २४ मार्च ते ४ एप्रिल २०२३) क्वालिफायरसाठी पात्र ठरतील आणि जो संघ आठव्या स्थानासह थेट वर्ल्ड कपसाठी पात्र ठरेल त्याव्यरिक्त तीन संघ क्वालिफायर मध्ये खेळतील. ही स्पर्धा १८ जून ते ९ जुलै या कालावधीत होईल आणि यातून २ संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयसीसीनेपाळश्रीलंकाद. आफ्रिकावेस्ट इंडिज
Open in App