Explainer India vs Pakistan T20 World Cup 2022 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावण्याचे स्वप्न पाहत आहे. मागच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला साखळी फेरीतही प्रवेश करता आला नव्हता. भारत-पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबरला मेलबर्न येथे होणाऱ्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील बाबर आजमच्या संघाने बाजी मारून इतिहास घडविला होता. पाकिस्तानने प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतावर विजय मिळवला. त्यानंतर आशिया चषक २०२२ मध्ये IND vs PAK यांच्यात दोन सामने झाले आणि हिशोब १-१ असा बरोबरीत सुटला. त्यामुळे मागच्या वर्ल्ड कपच्या पराभवाची परतफेड करण्यासाठी आजही भारतीय संघ आतुर आहे. पण, हा सामना होण्याची शक्यता २० टक्केच आहे.
ऑस्ट्रेलियातील हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी मेलबर्न येथे ढगाळ वातावरण राहणार आहे आणि पावसाची शक्यता ८० टक्के आहे. सायंकाळी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला गेला असल्याने भारत-पाकिस्तान सामना होणार नसल्याचाच अंदाज व्यक्त केला गेला आहे. रविवारीच नव्हे तर शनिवारीही पाऊस ९५ टक्के पडेल असे सांगण्यात येत आहे. याआधी भारत आणि पाकिस्तान यांचे अनुक्रमे न्यूझीलंड व अफगाणिस्तानविरुद्धचा सराव सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता.
रविवारी चाहत्यांना किमान ५-५ षटकांचा तरी सामना होईल अशी अपेक्षा आहे, परंतु तसे न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. कारण साखळी गटातील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. १० पेक्षा कमी षटकं झाल्यास आयोजकांनाही मोठा आर्थिक फटका बसणार आहे. आयोजकांना प्रेक्षकांना ३७ कोटी २५ लाख २३,९५० रुपयांचे रिफंड करावे लागणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"