मुंबई : भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर काही दिवसांपूर्वी उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली. पण ही बंदी उठल्यावर पृथ्वी आज मैदानात उतरला आणि त्याने तुफानी खेळी साकारत दमदार पुनरागमन केले.
उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी पृथ्वीवर आठ महिन्यांची बंदी घालण्याता निर्णय बीसीसीआयने घेतला होता. आज पृथ्वीवरील बंदी उठली आणि त्याने दिमाखात पुनरागमन केले आहे.
बीसीसीआयच्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत पृथ्वीने धडाकेबाज फलंदाजी करत आपले पुनरागमन साजरे केले. मुंबईचा आज आसामविरुद्ध सामना होता. या सामन्यात पृथ्वीने ३९ चेंडूंमध्ये ६३ धावांची जबरदस्त खेळी साकारली. या खेळीमध्ये त्याने सात चौकार आणि दोन षटकारांची बरसात केली. पृथ्वीच्या दमदा फलंदाजीच्या जोरावर मुंबईला २०५ धावांचा डोंगर उभारता आला. मुंबईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना आसामला १२३ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईने हा सामना ८३ धावांनी जिंकला.