मुंबई- भारतीय क्रिकेटर मोहम्मद शामीच्या विरोधात त्याची पत्नी हसीन जहांने मोर्चा उघडला आहे. गुरूवारी कोलकाताच्या लाल बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर शुक्रवारी महिला आयोगाचा पाठिंबाही हसीनला मिळाला. पण हसीनने अजूनही महिला आयोगाकडे तक्रार केली नसल्याचं आयोगाचं म्हणणं आहे. दुसरीकडे हसीनने तिचे फेसबूक अकाऊंट ब्लॉक करत मोहम्मद शमीच्या विरोधातील सर्व पोस्ट डिलीट केल्याचा दावा केला आहे.
मला कुणाकडूनही सहाय्य मिळालं नाही. त्यामुळे मी फेसबुकवर पोस्ट शेअर करत माझं म्हणणं मांडलं. पण आता फेसबुकने मला ब्लॉक केलं आहे. तसंच माझं मत विचारात न घेता मी केलेल्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. हे सगळं कशासाठी? अशी प्रतिक्रिया हसीनने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
या प्रकरणावर महिला आयोगही नजर ठेवून आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या चेअरमन रेखा शर्मा यांनी सांगितलं की, आमच्याकडे शमीच्या पत्नीने अजूनही तक्रार केलेली नाही. ती आमच्याकडे आली तर महिला आयोग या प्रकरणावर जरूर कारवाई करेल. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने शमीवर विवाहबाह्य संबंध व घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. इतकंच नाही, तर हसीनने शमीवर मॅच फिक्सिंगचा आरोपही केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शमी पाकिस्तानी मुलगी व इंग्लंडच्या व्यावसायिकासह मॅच फिक्स करतो, असा आरोप तिने केला आहे.